संगमनेर तालुक्यात २२ लाखांचा २०० गोण्या गुटखा पकडला

हरिभाऊ दिघे
रविवार, 24 सप्टेंबर 2017

पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचा छापा;

घरात साठवून ठेवला होता गुटखा 

तळेगाव दिघे ( जि. नगर ) : नगर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या विशेष पथकाने संगमनेर तालुक्यातील कोळवाडे शिवारातील एका घरावर छापा टाकून अंदाजे २२ लाख रुपये किंमतीचा २०० गोण्या गुटखा जप्त करण्यात आला. शनिवारी ( दि. २३ ) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

 संगमनेर तालुक्यातील कोळवाडे शिवारात लालू रंगनाथ कोडे यांच्या घरात २०० गोण्या गुटखा साठवून ठेवण्यात आला होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून घरातून २०० गोण्या गुटखा जप्त करीत कारवाई केली.

या प्रकरणी जोर्वे ( ता. संगमनेर ) येथील एकास गुटखा मालक असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्न व औषध प्रशासन विभागाकडून यासबंधी कारवाई करण्यात येणार आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे यांनी सांगितले. संगमनेर तालुक्यात २२ लाख रुपये किंमितीचा गुटखा पकडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: nagar news sangamner gutkha siezed