बिबट्याच्या परिवाराचा मुक्तसंचार !

हरिभाऊ दिघे
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

सोनोशी शिवारातील प्रकार; ग्रामस्थांमध्ये घबराट 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील सोनोशी शिवारात गेल्या पंधरा दिवसांपासून बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु असून त्यांनी परिसरातील कुत्री फस्त करण्याचा सपाटा लावला आहे. भरदिवसा बिबट्यांचे दर्शन होवू लागल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोनोशी (ता. संगमनेर) शिवारातील दशरथ कारभारी गीते नामक शेतकऱ्याच्या मका पिकात बिबट्याच्या परिवाराने बस्तान मांडले आहे. एक नर, एक मादी व त्यांची दोन बछडे तळ ठोकून आहेत. कधी दिवसा, तर कधी रात्री त्यांचा मुक्तसंचार सुरु होतो. याबाबत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले. मात्र बिबट्यांना पकडण्यासाठी अद्याप पिंजरा लावण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. बिबट्याच्या परिवाराने मका पिकात तळ ठोकल्याने शेतात जाता येत नाही, अशी कैफियत दशरथ गीते यांनी मांडली. बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाने त्वरित पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कुत्रीची पिले अनाथ !
दशरथ गीते यांच्या पाळीव कुत्रीने नुकताच पिल्लांना जन्म दिला होता. मात्र बिबट्यांनी रात्रीच्या सुमारास हल्ला करून कुत्री फस्त गेली. डोळे उघण्याच्या आता मातृछत्र हरपल्याने कुत्रीची पिले अनाथ झाली आहेत.

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

 

Web Title: nagar news sangamner stray leopard family