स्वाईन फ्लू सदृश आजाराने घेतला संगमनेरमधील पाचजणांचा बळी !

हरिभाऊ दिघे
रविवार, 30 जुलै 2017

  • संगमनेर तालुक्यातील प्रकार
  • ७७ संशयित रुग्ण
  • १५ जणांना स्वाईनची लागण 

तळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यात स्वाईन फ्लू सदृश आजाराने थैमान घातले असून अवघ्या पाच महिन्यातच ५ जणांचा बळी घेतला आहे. तर १५ जणांना स्वाईन फ्लू सदृश आजाराची लागण झाली असून ७७ संशयित रुग्ण तालुक्यात आढळले आहेत. संगमनेर तालुका पंचायत समितीमध्ये शनिवारी ( दि. २९ ) दुपारी आयोजित आरोग्य विभागाच्या बैठकीत ही माहिती उघड झाली आहे.

संगमनेर तालुक्यात मार्च २०१७ ते जुलै २०१७ या कालावधीत स्वाईन फ्लू सदृश आजाराने प्रियंका अशोक कांडेकर ( वय १६ रा. पळसखेडे), विमल बंडू दिघे ( वय ५० रा. कोल्हेवाडी), आशा राजेंद्र थोरात ( वय ४०, रा. जाखुरी ), शोभना राजेंद्र कासार ( वय ४५, रा. घुलेवाडी ), राजेंद्र सोमनाथ गाढे ( वय ४५ रा. सावरगावतळ ) या पाच जणांवर प्राथमिक उपचार करुन नाशिक व मुंबई येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तर तालुक्यातील पंधरा रुग्णांना स्वाईन फ्लू सदृश आजाराची लागण झाली असून ७७ रुग्ण संशयित आढळल्याचे आरोग्य विभागातर्फे बैठकीत सांगण्यात आले.

या संदर्भात पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिल्या. उपसभापती नवनाथ अरगडे, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर मराठे यांच्यासह वैद्यकिय अधिकारी व आरोग्य कर्मचारी बैठकीस उपस्थित होते. स्वाईन फ्लू आजाराबाबत जनजागरण पत्रकांचे यावेळी वाटप करण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nagar news sangamner swine flu deaths