श्रीगोंद्यात अमर्याद वाळू उपसा; वनविभागाच्या हद्दीतही उपसा सुरू

संजय आ. काटे
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

स्थानिक वाळूचोरांना दौंडच्या 'दादा' लोकांची मोठी धास्ती आहे. यंत्रणेचे तोंड अर्थकारणाने बंद केले असले तरी इतरांची पैशाची मागणी असणारी मोठी यादीच आहे. अनेकांनी त्यांना आठवड्याच्या रकमाच ठरवून घेतल्या आहेत. 'आम्हाला खरचं काही परवडत नाही कुणाही यावे आणि पैशाची मागणी करावी अशी स्थिती आहे. त्यामुळे आम्ही जीव धोक्यात घालून चोरी करीत असलो तरी प्रत्यक्षात इतरांनाच वाटप करावे लागते' असेही काहींनी खाजगीत सांगितले.

श्रीगोंदे (नगर): अमर्याद वाळू उपशामुळे भीमा नदीपात्रात खडक लागल्याने वाळूचोरांनी त्यांचा मोर्चा लगतच्या वनविभागाच्या हद्दीत वळविला आहे. गार व कौठे (ता. श्रीगोंदे) येथे वनविभागाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन होत असल्याने शेकडो वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. श्रीगोंदे व दौंड येथील वाळूचोर अनेकांच्या डोळ्यावर अर्थकारणाची पट्टी बांधून पर्यावरणाचा मनसोक्त ऱ्हास करीत आहेत. 

भीमा व घोड नदीपात्रात श्रीगोंदे, दौंड व शिरुर तालुक्यातील वाळूचोर अमर्याद वाळू उपसा करण्यात वर्षभर दंग असतात. मात्र काही दिवसात वाळूचोरांनी त्यांचा मोर्चा लगतच्या वनखात्याच्या क्षेत्राकडे वळविल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. नदीच्या पुरापासून धूप रोखण्यासाठी वनविभागाचे झाडे मोठी मदत करतात. मात्र तेथे जमिनीच्या खाली जमा झालेली वाळू काढण्यासाठी  वाळूचोरांनी या फाॅरेस्ट भागाला लक्ष्य केले आहे.

तालुक्यातील गार व कौठे या शेजारच्या गावातील भीमेच्या हद्दीत वनखात्याच्या हद्दीत मोठे उत्खनन सुरु आहे. त्यात श्रीगोंदेसह दौंड येथील वाळूचोरांची चांदी होत असली तरी झाडांची कत्तल होतानाच वनखात्याची हद्द नदीच्या प्रहावात कमी होत आहे.  तेथील वाळूचोर जेसीबी यंत्रांच्या मदतीने झाडे काढून पाण्यात टाकून देतात. नंतर बोटी अथवा यंत्राच्या साह्याने वाळू उपसा सुरु करतात. वाळूची वहातूक करण्यासाठी पुन्हा झाडे तोडून रस्ते केले आहेत. 

सदर प्रतिनिधीने पाहणी केली असता, नदीचे मूळ पात्र बाजूला राहिले असून वाळूचोरांच्या वनखात्यातील वाळू उपशामुळे पात्र रुंदावले आहे. शेकडो झाडांचा बळी गेला असला तरी सगळेच हातावर हात धरुन आहेत. या चोरीत दौंड येथील बडे तस्कर दादागिरी करुन हा उपसा करतात असे समजले. श्रीगोंद्याच्या हद्दील येवून बोटींच्या साह्याने काढलेली वाळू दौंड हद्दील पाण्यातून वाहून नेली जाते. तेथे मालट्रक भरुन पुण्याला पाठवितात. दौंडचे चोरश्रीगोंद्याच्या हद्दीत बिनधास्तपणे वाळू काढत असल्याने स्थानिक हातावर हात धरुन बसले नाहीत. त्यांनीही यात हात धूवून घेण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे या दोन गावात वनखात्याचे मोठ्याक्षेत्रावर वाळू चोरांनी उत्खनन करुन कब्जा केल्याचे दिसले. 

येथील वनपरिक्षेत्रपाल अश्विनी दिघे म्हणाल्या, आपण नव्याने येथील पदभार घेतला आहे. मात्र त्या भागातील तक्रारी आल्यानंतर समक्ष भेट देवून संबधीतांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटीसा बजाविल्या आहेत. मनुष्यबळ कमी असल्याने वरिष्ठांना त्याबाबत कळविले असून आमच्या हद्दीत जे खोदकाम झाले आहे त्याबद्दल कठोर कारवाई करणार आहे. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Web Title: nagar news shrigonde sand mafia bhima riverbed