रस्ता लवकर होण्यासाठी तोंडाला मास्क लावून गांधीगिरी

रस्ता लवकर होण्यासाठी तोंडाला मास्क लावून गांधीगिरी
रस्ता लवकर होण्यासाठी तोंडाला मास्क लावून गांधीगिरी

तिसगाव (नगर): शिवरस्त्याचे काम चालू आहे की राष्ट्रीय महामार्गाचे हे कळेनासे झाले, अशी राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर टीका करत तिसगावचे युवानेते भाऊसाहेब लवांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तोंडाला मास्क लावून गांधीगिरी केली. रस्त्याचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी पुलावर अभिषेक घालण्यात आला.

तिसगावच्या बाजारपेठेतून गेलेल्या कल्याण विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरु आहे. पुलाचे कामही अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे होत असलेले नुकसान व धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असताना देखील या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने युवानेते भाऊसाहेब लवांडे, उपसरपंच इलियास शेख, भिवसेन अकोलकर, शरद खंडागळे, शिराज पठाण, आदिनाथ कवळे, अमोल वाबळे, वहाब इनामदार आदी प्रमुख कार्यकर्त्यासह व्यावसायिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुलावर एकत्र येऊन तोंडाला मास्क लावून आगळे वेगळे आंदोलन केले.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना भाऊसाहेब लवांडे यांनी सांगितले की, गावातील रस्तारुंदीकरणाचे एक किलोमीटरचे काम वर्षभरात पूर्ण करता आले नाही. अतिशय मंद गतीने काम चालू असल्याने तिसगावच्या बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दुकानदारांना आर्थिक फटका बसलेला आहे. अर्धवट कामामुळे अपघात होऊ नये म्हणून सूचना फलक आदी उपाय योजना ठेकेदाराकडून राबविल्या गेल्या नाहीत. एक प्रकारे प्रवाशाच्या जीवाशी खेळले जात आहे. वाहतूक व ग्रामस्थाच्या सुरक्षिततेचे यांना काहीच देणे घेणे नाही. ठेकेदाराचा मनमानी कारभार चालू असल्याची टीका ही लवांडे यांनी यावेळी केली.

नवीन पूलावर माती टाकलेली असल्याने धुळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील लहानमुले, महिला व दुकानदारांना श्वसनाचे त्रास सुरू झालेला आहे. कामामुळे पाईपलाईन फुटल्याने काही भागातील पाणी पुरवठा अनेक महिन्यापासून बंद आहे. प्रशासनाने या प्रश्नांची गंभीरतेने दखल घेऊन रेंगाळलेले काम 15 दिवसात पूर्ण करावे अन्यथा गाव बंद ठेवून तीव्र रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी दिला आहे. यावेळी प्रवाशी तसेच व्यापारयाना मास्क वाटप करण्यात आले. या आंदोलनात बाळासाहेब बोरुडे, आरिफ तांबोळी, महेश शिंदे, नंदू वाबळे, बाळासाहेब थोरात, संजय लवांडे आदी कार्यकर्त्यासह व्यापारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com