गॅस सिलेंडर भरलेल्या मालट्रकची धडक; दोघे गंभीर

हरिभाऊ दिघे
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

तळेगाव दिघे (जि. नगर) : गॅस सिलेंडर भरलेला मालट्रक व मोटारीच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. आज (सोमवार) दुपारी दोनच्या सुमारास लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला (ता. संगमनेर) गावाजवळ ही घटना घडली. गॅस सिलेंडर भरलेला मालट्रक न उलटल्याने मोठी दुर्घटना टळली.

तळेगाव दिघे (जि. नगर) : गॅस सिलेंडर भरलेला मालट्रक व मोटारीच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. आज (सोमवार) दुपारी दोनच्या सुमारास लोणी-नांदूरशिंगोटे रस्त्यावर नान्नजदुमाला (ता. संगमनेर) गावाजवळ ही घटना घडली. गॅस सिलेंडर भरलेला मालट्रक न उलटल्याने मोठी दुर्घटना टळली.

सिन्नर येथून मालट्रकमध्ये (क्र. एमएच १६ एइ ३५१२) साडेचारशे गॅस सिलेंडर भरून चालक लक्ष्मण भागुजी मेहेत्रे (रा. नगर) हे नगरच्या दिशेने चालले होते. दरम्यान, नान्नजदुमाला गावानजीक समोरून आलेल्या नाशिकच्या दिशेने चाललेल्या इऑन मोटारीची (क्र. जीजे ०६ एलबी ३८८१) व मालट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटारीमधील प्रज्ञेश गिरीशकुमार राव (वय ३६) व पद्मा गिरीशकुमार राव (वय ५२ रा. वरोदा, गुजरात) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राव कुटुंबीय शनिशिंगणापूर येथून दर्शन घेवून परतीचा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, पश्चिमेच्या दिशेने चाललेल्या इऑन मोटारीचा दर्शनीभाग पूर्वेकडे फिरला. पोलिस कर्मचारी किशोर पालवे यांनी घटनास्थळी येवून अपघाताची पाहणी केली. मालट्रकमध्ये साडेचारशे गॅस सिलेंडर भरलेलेले होते. सदर मालट्रक उलटला असता तर मोठी दुर्घटना घडली असती, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत मालट्रक रस्त्याच्याकडेला उभा केल्याने मोठी दुर्घटना टळली. अपघातात इऑन मोटारीच्या दर्शनीभागाचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी फिर्यादीनुसार संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात येणार असल्याचे पालवे यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
Web Title: nagar news truck car accident near loni nandur shingote