येथे मृत्यू कवेत घेतो

सूर्यकांत वरकड
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

गेल्या 20 दिवसांपासून जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे नगर-सोलापूर रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले. प्रत्येक दहा फुटांवर भला खोल खड्डा तयार झाला. त्यामुळे रस्त्याने वाहन चालवावे कसे, असा प्रश्‍न चालकांना पडतो.

नगर : दररोज हजारो वाहनांची वर्दळ... मालवाहू मोटारी नि महाकाय कंटेनर... दुचाकीस्वार चालतात जीव मुठीत धरून... कारण प्रत्येक दहा फुटांवर मोठा खड्डा... हा महामार्ग आहे की पांदण रस्ता, हेच समजायला तयार नाही. ही स्थिती आहे नगर-सोलापूर महामार्गाची!

राजस्थान, दिल्ली, हरियाना, गुजरातमधून येणाऱ्या मालवाहू मोटारींना कर्नाटकात जाण्यासाठी मनमाड-नगर-सोलापूर हा महामार्ग जवळचा आहे. त्याचबरोबर नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद येथील उद्योजकांना कर्नाटक, कोल्हापूरला जाण्यासाठी हाच जवळचा मार्ग. त्यामुळे त्यावर मालवाहू मोटारींसह अन्य वाहनांची नेहमीच प्रचंड वर्दळ.

दरम्यान, गेल्या 20 दिवसांपासून जिल्ह्यात धो-धो पाऊस झाला. त्यामुळे नगर-सोलापूर रस्त्याचे प्रचंड नुकसान झाले. प्रत्येक दहा फुटांवर भला खोल खड्डा तयार झाला. त्यामुळे रस्त्याने वाहन चालवावे कसे, असा प्रश्‍न चालकांना पडतो. त्यात मिरजगाव ते वाळुंज, पारगाव परिसरातील तरुण रोजगारासाठी रोज नगरला येतात. दहिगाव येथून दूधउत्पादकही नगरला दूध घालण्यासाठी येतात. त्यांचा रोजचा प्रवास प्रचंड जीवघेणा असतो. हजारो खड्डे चुकवत नगरात यायचं आणि पुन्हा तीच कसरत करीत परतायचं, असा त्यांचा दिनक्रम असतो.

रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नाही. लोकप्रतिनिधीही आवाज उठवीत नाही, अशी परिस्थिती आहे. अशा वेळी सामान्याने दाद मागायची तरी कोणाकडे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

आता पाऊस थांबला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ रस्तादुरुस्तीचे काम हाती घेणे अपेक्षित आहे. रस्तादुरुस्ती न केल्यास "शिवसेना स्टाइल' आंदोलन करू.
- संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagar-Solapur road dangerous for drivers