जिल्हा परिषद अध्यक्षपदी शालिनी विखे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

राजश्री घुले उपाध्यक्ष; कॉंग्रेस आघाडीसोबत शिवसेनेसह अपक्षही

राजश्री घुले उपाध्यक्ष; कॉंग्रेस आघाडीसोबत शिवसेनेसह अपक्षही
नगर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या शालिनी राधाकृष्ण विखे पाटील व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राजश्री चंद्रशेखर घुले यांची आज निवड झाली. विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे सदाशिव पाचपुते यांचा 33 मतांनी व घुले यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे दादासाहेब शेळके यांचा 32 मतांनी पराभव केला. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेसह अपक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीसोबत राहिले. माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे पाच सदस्य भाजपसोबत राहिले.

अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी एक होती. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याचे जाहीर झाले असले, तरी दोन दिवसांपासूनच्या घडामोडी पाहता आघाडीत बिघाडी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.

अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसकडून विखे पाटील व उपाध्यक्षपदासाठी घुले यांनी सोबत येऊन साडेबारा वाजता अर्ज दाखल केला. त्याने आघाडी झाल्याचे निश्‍चित झाले. त्यानंतर काही वेळेतच पाचपुते यांनी अध्यक्षपदासाठी व शेळके यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने गडाखांचे पाच सदस्य भाजपसोबत असल्याचे उघड झाले.

विशेष सभेला तीन वाजता सुरवात झाली. बारा सदस्यांची एक रांग अशा 12 रांगांची बैठक व्यवस्था केली होती. सुरवातीला अर्जांची छाननी करून माघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली. सभागृहात विखे व घुले यांच्या बाजूने बहुमत असल्याचा अंदाज आल्यावर विरोधक माघार घेतील, असे सदस्यांना वाटत होते. मात्र, कोणीही माघार घेतली नाही.

त्यामुळे आधी हात वर करून व नंतर सह्यांद्वारे मतदान झाले.
विखे पाटील यांना कॉंग्रेसची 23, राष्ट्रवादी कॉंग्रेसची 18, शिवसेनेची सहा, श्रीरामपूरच्या महाआघाडीची दोन व अपक्षांची दोन अशी 52 मते मिळाली. शिवसेनेच्या सदस्य भाग्यश्री मोकाटे मतदानाला उपस्थित नव्हत्या. पाचपुते यांना भाजपच्या 14 व क्रांशेपच्या पाच सदस्यांनी मतदान केले. घुले यांना कॉंग्रेससह राष्ट्रवादी, शिवसेना, श्रीरामपूरच्या महाआघाडीचे दोन व एका अपक्षाने मतदान केले. हर्षदा काकडे यांनी उपाध्यक्षपदासाठी शेळके यांना मत दिले. त्यामुळे घुले यांना 51 व शेळके यांना 20 मते मिळाली.

निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी निवड जाहीर केल्यानंतर विखे पाटील व घुले यांचा सत्कार केला. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ. अशोक कोल्हे, उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, अरुण आनंदकर, तहसीलदार गणेश मरकड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी मदत केली.
या निवडणुकीत मतदान करता येत नसले, तरी सभागृहाचे सदस्य असल्याने पंचायत समित्यांच्या नूतन सभापतींची बसण्याची व्यवस्था सभागृहात करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले. निवडणुकीसाठी सभागृहात "सीसीटीव्ही' कॅमेरेही बसविण्यात आले होते.

Web Title: nagar zp chairman shalini vikhe patil