नायकवडी-जयंतरावांचे ‘तुझ्या गळा... माझ्या गळा’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

मिरज - महाआघाडीचे पुरते बारा वाजवणाऱ्या नायकवडींसोबत जुळवून घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आता दोन पावले माघार घेतली आहे. यापुढे ‘नायकवडी नाव महापालिकेत  दिसणार नाही’ अशी मिरजेच्या ऐतिहासिक किसान  चौकात भीमगर्जना करणाऱ्या जयंतरावांसोबत गेल्या सहा महिन्यांपासून नायकवडींची जवळीक वाढत गेली आणि आता झाले गेले गंगेला मिळाले असे म्हणत त्यांनी निवडणूक मैदानासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

ज्येष्ठ नेते इलियास नायकवडी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांचे एक चिरंजीव अय्याज आणि सूनबाई वहिदा या काँग्रेसमधील प्रकाशबापू पाटील गटाशी कायम निष्ठावान असतात. तर दुसरे चिरंजीव  इद्रिस नायकवडी राष्ट्रवादीत असताना महाआघाडीच्या शेवटच्या टर्ममध्ये महापौर झाले. त्यानंतर त्यांनी जयंतरावांचे नेतृत्व झुगारून देत माजी मंत्री मदन पाटील व माजी आमदार संभाजी पवार यांच्या मदतीने आघाडीचे पुरते बारा वाजवले.

हे सारे असले तरी नायकवडी यांचे नेहमीच निसरडीचे राजकीय धोरण असते. याचा प्रत्यय त्यानंतरही आला. या निवडणुकीला ते काय करतील याबद्दल आडाखे बांधले जात होते. सुरेश आवटी, अनिलभाऊ कुलकर्णी, विवेक कांबळे या त्यांच्या मिरज पॅटर्नच्या शिलेदारांची भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर ते भाजपसोबत जाणार अशीही चर्चा सुरू झाली. तसा प्रयत्न करताना त्यांनी महापालिका संघर्ष समितीचे निवडणूक आयोगाकडे रजिस्ट्रेशन केले. संपूर्ण महापालिका क्षेत्रात आम्ही लढू असेही त्यांनी जाहीर केले. भाजपकडे त्यांनी बाहेरून पाठिंबाही मागितला. मात्र त्यांची डाळ काही शिजली  नाही. 

काल त्यांची नावे राष्ट्रवादीच्या इच्छुकाच्या मुलाखतीच्या यादीत होती. त्यांनी थेट मुलाखती दिल्या नाहीत मात्र ते राष्ट्रवादीसोबत राहतील निश्‍चित झाले. प्रभाग क्रमांक पाच मधून माजी महापौर इद्रिस आणि प्रभाग सहा मधून त्यांचे पुत्र अतहर या दोघा पिता-पुत्रांनी उमेदवारीची मागणी केली आहे. तशी त्यांनी म्हणे सहा जागांची राष्ट्रवादीकडे मागणी केली आहे. आमचे  अस्तित्व सुरक्षित राखून त्यांनी राष्ट्रवादीशी तह की सामिलीकरण केले आहे. सध्या काँग्रेसबरोबरची आघाडीच्या ताणाताणीचेही तेच कारण आहेत म्हणे.

Web Title: naikwadi Jayant patil NCP Politics