मंगळवेढ्यात मयत आणि जमीन विकलेल्यांच्या नावे पीककर्ज घेतल्याचे उघड

तात्या लांडगे
शनिवार, 12 मे 2018

कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना योग्यप्रकारे कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे का, कोणी त्यांच्या नावे बोगस कर्ज उचलली आहेत का यासह अन्य बाबींची चौकशी करण्याकरिता आता नमूना लेखापरीक्षण होणार आहे. त्यासाठी 75 लेखापरीक्षकांची नियुक्‍ती करण्यात आली असून सर्व शेतकऱ्यांची खाती त्यांच्यामार्फत पडताळण्यात येतील. 

- अविनाश देशमुख, जिल्हा उपनिबंधक

सोलापूर : मंगळवेढा तालुक्‍यातील सिध्दापूर-तांडोर विकास सोसायटीतून एका मयत आणि जमीन विकलेल्या एका शेतकऱ्यांने कर्ज काढले आहे. हा प्रताप या विकास सोसायटीच्या अध्यक्ष, सचिव व जिल्हा बँकेच्या संबंधित शाखेतील बॅंक इन्स्पेक्‍टर यांनी संगनमताने केला आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांना दिले आहेत. 

2008 ते 2015 या कालावधीत शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज उचलण्यात आली आहेत. सुंदराबाई बसगोंडा पाटील, बाळासाहेब चनबसप्पा चौगुले, पुष्पावती आप्पासाहेब तळ्ळे, कस्तुराबाई शिवगोंडा पाटील अशा दहा शेतकऱ्यांच्या नावे 18 लाख 83 हजार रुपयांचे परस्पर कर्ज उचलली आहेत, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

जिऊबाई विठोबा सोनगे या 2012 मध्ये मयत झाल्या. परंतु, 16 जून 2013 मध्ये त्यांनी मंगळवेढ्यातील सिध्दापूर-तांडोर विकास सोसायटीतून 1 लाख 4 हजारांचे कर्ज घेतले असून रामगोंडा मुत्यानवर व सरस्वती मुत्यानवर यांनी सन 2008-09 मध्ये त्यांच्या जमिनीची विक्री केली आहे. तरीही सरस्वती मुत्यानवर यांनी त्यांच्या जमिनीवर 29 जूलै 2013 रोजी 78 हजार रुपयांचे कर्ज घेतल्याचे दाखविण्यात आले आहे. 

Web Title: In the name of the deceased and the landowners the crop loan has been taken