सांगली महापालिकेत भाजपकडून सूर्यवंशी, मगदूम यांची नावे निश्‍चित 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्‍चित झाली. आज सकाळी पुन्हा भाजपच्या कोअर टीमची बैठक झाल्यानंतर हा निर्णय झाला.

सांगली : महापालिकेतील सत्ताधारी भाजपकडून महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांची नावे निश्‍चित झाली. आज सकाळी पुन्हा भाजपच्या कोअर टीमची बैठक झाल्यानंतर हा निर्णय झाला. कॉंग्रेसकडून उत्तम साखळकर, उमेश पाटील महापौर-उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. आज दुपारी तीनपुर्वी ते अर्ज दाखल करतील. 

सत्ताधारी भाजपमध्ये तीन सदस्यांच्या नावावर काल दिवसभर कोअर कमिटीची चर्चा सुरू होती. आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, सुरेश आवटी, शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, मकरंद देशपांडे आदी नेत्यांच्या बैठका सुरू होत्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन महापौर करण्यास हिरवा कंदील दाखवल्याने पहिली संधी कुणाला मिळणार याकडे लक्ष लागले होते. कोअर कमिटीच्या नेत्यांमध्ये आज पुन्हा धीरज सूर्यवंशी आणि गजानन मगदूम यांच्या नावावर एकमत झाले. या दोघांना दहा महिने संधी देण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादीच्या नावाबाबत मात्र अद्याप एकमत झालेले नाही. दोन्ही कॉंग्रेस मिळून उमेदवार देणार आहेत. आधी अर्ज दाखल करून नंतरच योग्य उमेदवारांचे अर्ज ठेवून माघार घ्यावी यावर दोन्ही कॉंग्रेसमध्ये एकमत झाले आहे. 

महापालिकेतील पक्षीय बलाबल

(एकूण सदस्य 78) 

भाजप : 43 , कॉंगेस : 19, राष्ट्रवादी : 15, एकूण : 77 
मयत : 1 (हारुण शिकलगार, कॉंग्रेस), 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The names of Suryavanshi and Magdoom have been decided by BJP in Sangli Municipal Corporation