'अमूल'पाठोपाठ "नंदिनी' दूधही राज्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - राज्यात "अमूल‘पाठोपाठ कर्नाटकातील "नंदिनी‘ दूध संघाने पाय पसरण्यास सुरवात केली आहे. दोन्ही संघांचा दणका राज्यात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या "गोकुळ‘सारख्या संस्थांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आज मुंबईत "नंदिनी‘ दुधाचे लॉचिंग झाले, भविष्यात या संघाकडून पहिले लक्ष्य कोल्हापूर होण्याची शक्‍यता आहे.

कोल्हापूर - राज्यात "अमूल‘पाठोपाठ कर्नाटकातील "नंदिनी‘ दूध संघाने पाय पसरण्यास सुरवात केली आहे. दोन्ही संघांचा दणका राज्यात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या "गोकुळ‘सारख्या संस्थांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे. आज मुंबईत "नंदिनी‘ दुधाचे लॉचिंग झाले, भविष्यात या संघाकडून पहिले लक्ष्य कोल्हापूर होण्याची शक्‍यता आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार "अमूल‘ने राज्यात दूध संकलनाला सुरवातही केली आहे. "अमूल‘चे पुढचे टार्गेट हे "गोकुळ‘चे कार्यक्षेत्रच असणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच अमूलच्या काही अधिकाऱ्यांनी कोल्हापुरात बंद पडलेल्या संघाची चाचपणीही सुरू केली आहे. राज्यात किमान पाच हजार कोटींची गुंतवणूक करण्याची त्यांची तयारी आहे. दुधाला प्रतिलिटर काही रक्कम वाढवून देऊन स्थानिक संघाचे मार्केट "कॅश‘ करायचे हेच "अमूल‘चे धोरण आहे.

‘अमूल‘ गुजरातमधील 64 जिल्हा संघांचा एकमेव ब्रॅंड आहे. त्याच धर्तीवर कर्नाटकात "नंदिनी‘ संघ कार्यरत आहे. या दोन्ही संघांना त्या त्या राज्यांचा मोठा पाठिंबा आहे. "नंदिनी‘ला तर कर्नाटक सरकार प्रतिलिटर चार रुपये अनुदान देते. महाराष्ट्रात दूध व्यवसायाचे निश्‍चित असे धोरणच नाही. त्यामुळे गावांत पाच-सहा संस्था, जिल्ह्यात डझनभर संघ आणि राज्यातही तीच स्थिती असे चित्र आहे. "अमूल‘ने पहिल्यांदा कोट्यवधीची गुंतवणूक करून पुण्यात संकलन सुरू केले, त्याचा पहिला दणका "महानंदा‘ या सरकारी डेअरीला बसला. त्यांचे संकलन चार लाख लिटरवरून 1 लाख 80 लिटरवर आले.

राज्याच्या इतर तुलनेत कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत दुधाचा व्यवसाय मुबलक आहे. राज्यात एकूण दूध संकलनात 65 टक्के वाटा हा खासगी क्षेत्राचा तर 35 टक्के वाटा सहकारी संघाचा आहे. नेमका याचाच फायदा घेण्यासाठी "अमूल‘ व "नंदिनी‘ महाराष्ट्रात पाय रोवू पाहात आहेत. त्यांना रोखून राज्यातील संघांना बळ देण्याऐवजी राज्य सरकारकडून बाहेरून येणाऱ्या संघांना पायघड्या घातल्या जात आहेत. त्याचा फटका "गोकुळ‘सारख्या चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या सहकारी संघांना बसल्याशिवाय राहणार नाही. काळाची ही पावले ओळखूनच राज्य सरकार व सहकारी संघांनी आपले यापुढचे धोरण आखण्याची गरज आहे.

"गोकुळ‘ची मार्केटिंगमध्ये आघाडी
भविष्यात "अमूल‘चे आव्हान ओळखून "गोकुळ‘ ने मार्केटिंग क्षेत्रात मोठी आघाडी घेतली आहे. उत्पादकांना अधिकाधिक भाव देण्याबरोबरच कोट्यवधीचा दूध फरक दिला जात आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात जाहिरातवरही भर दिला आहे. दूरचित्रवाणीवरील काही कार्यक्रमांचे प्रायोजकत्व स्वीकारून "गोकुळ‘ आपला ब्रॅंड रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.

Web Title: Nandini milk in state after amul