दाभोलकर हे ज्योतिषी होते...कालसर्पवगैरे थोतांड.. ज्योतिष मंडळच म्हणतंय...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

""कालसर्प योग, मूळ नक्षत्र व शनीची अवकृपा हे थोतांड आहे. त्याचा ज्योतिषाशी काही सबंध नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे. कर्मकांडाला फाटा देऊन त्याची विज्ञानासोबत सांगड घालता येते. फॅमिली डॉक्‍टरप्रमाणे फॅमिली ज्योतिषी ही संकल्पना रूढ करावी.

शिर्डी ः शनीची साडेसाडी, कालसर्प, मूळ नक्षत्र या गोष्टी हिंदू धर्मातील लोकांच्या पोटात खड्डा आणतात. काहीजण त्याला कडाडून विरोध करतात. केवळ हा पोटं भरण्याचा धंदा असल्याचीही टीकाही ज्योतिषांवर केली जाते. मात्र, ज्योतिषांनीच या गोष्टी केवळ थोतांड असल्याचे कबुल केले आहे. आणि तेही ज्योतिषांच्या संमेलनात ही गोष्ट घडलीय. त्यांच्या अध्यक्षांनीच तसे मान्य केले आहे. नेमका काय प्रकार आहे हा... 

ज्योतिषी म्हणजे फॅमिली डॉक्‍टर 
""कालसर्प योग, मूळ नक्षत्र व शनीची अवकृपा हे थोतांड आहे. त्याचा ज्योतिषाशी काही सबंध नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे. कर्मकांडाला फाटा देऊन त्याची विज्ञानासोबत सांगड घालता येते. फॅमिली डॉक्‍टरप्रमाणे फॅमिली ज्योतिषी ही संकल्पना रूढ करावी. करिअर, आरोग्य व कौटुंबिक सौख्यासाठी ज्योतिषाचे महत्त्व सर्वाधिक आहे,'' असे प्रतिपादन बृहन्‌ महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी केले. 

शिर्डीत ज्योतिष संमेलन 
शिर्डी येथे पंचविसाव्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनास त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. एस. झेड. देशमुख, नगराध्यक्ष ममता पिपाडा, प्रा. जवाहर मुथा, ग्रहांकित मासिकाचे संपादक चंद्रकांत शेवाळे, शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके, संयोजक नंदकिशोर जकातदार, ऍड. मालती शर्मा व मधुकांत कांबळे उपस्थित होते. 

पुणे विद्यापीठात ज्योतिष शास्त्र अभ्यासक्रम 
जकातदार म्हणाले, ""सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्योतिषावर अभ्यासक्रम सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा ज्योतिषावर चांगला अभ्यास होता. त्यांची टीका अभ्यासपूर्ण असायची, हे ज्योतिषांनी लक्षात घ्यावे. दुर्धर आजार झालेल्या रुग्णांच्या जन्मपत्रिकांचा तौलनिक अभ्यास करून काढण्यात आलेले निष्कर्ष ऐंशी टक्के बरोबर आले आहेत. आम्ही ज्योतिषाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून संशोधन सुरू ठेवले आहे. विज्ञानाच्या कसोटीवर ते उतरते.'' 

घटस्फोट टाळता येतो 
जकातदार म्हणाले, ""विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शेकडो जन्मपत्रिकांचा अभ्यास करून आम्ही निष्कर्ष काढले. विवाहसौख्य आणि घटस्फोट हे सध्या कळीचे मुद्दे आहेत. त्याबाबत ज्योतिषशास्त्र जन्मपत्रिकेच्या आधारे मार्गदर्शन करू शकते. ज्योतिषांनी प्रदीर्घ अभ्यास केल्यानंतरच जन्मपत्रिका पाहावी.'' 
प्रा. देशमुख, डॉ. राजेंद्र पिपाडा व शेवाळे यांची भाषणे झाली. 

दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

अखिल भारतीय ज्योतिष परिषदेत आयोजित केलेल्या प्रदर्शनात महत्त्वाच्या व्यक्तींच्या जन्मपत्रिका व त्यावरील निष्कर्ष, विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांच्या जन्मपत्रिकांचा अभ्यास करून काढलेला निष्कर्ष व शोधनिबंध, तसेच ज्योतिषशास्त्राची माहिती देणारी दुर्मिळ पुस्तके ठेवण्यात आली आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Dabholkar is an astrologer