नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा ‘एनडीए’ सरकार - रामदास आठवले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सातारा - मोदी सरकार हे लोकहिताची कामे करत आहे. हे सरकार पारदर्शी असल्याने आमचा त्यांना आगामी निवडणुकीतही बिनशर्त पाठिंबा राहील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. 

सातारा - मोदी सरकार हे लोकहिताची कामे करत आहे. हे सरकार पारदर्शी असल्याने आमचा त्यांना आगामी निवडणुकीतही बिनशर्त पाठिंबा राहील. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एनडीए सरकार स्थापन करू, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे व्यक्त केला. 

येथील ज्ञानविकास मंडळाने समर्थ सदनात आयोजित वसंत व्याख्यानमालेचा समारोप काल मंत्री आठवले यांच्या ‘मोदी सरकारला पर्याय नाही’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. व्यासपीठावर ‘ज्ञानविकास’चे संस्थापक वि. ल. चाफेकर, ॲड. डी. व्ही. देशपांडे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड होते. श्री. आठवले म्हणाले ‘‘गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारने लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. हे सरकार पारदर्शी आहे. मोदी दलितविरोधी नाहीत. काँग्रेसच्या सत्ताकाळात प्रलंबित राहिलेले प्रश्‍न मोदींनी त्यांच्या कार्यकाळात पूर्ण केले आहेत. मोदी दलितविरोधी असल्याचा प्रचार सातत्याने काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांच्याकडून होत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने ॲट्रॉसिटी कायद्यामधील अटक करण्याच्या मुद्द्यावर निकाल दिला असला, तरी केंद्र सरकार या कायद्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली असून, वेळप्रसंगी वटहुकूमदेखील काढला जाईल.’’ 

पंतप्रधान म्हणून मोदी घेत असलेले निर्णय लोकांना पटत असल्यानेच विविध राज्यांत भाजपची सत्ता येत आहे. आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होईल, असा विश्‍वास व्यक्त करून श्री. आठवले यांनी एनडीएसोबत जाण्यामध्ये दलित समाजाचे हित असल्याचे विविध दाखलेही दिले. शिवसेना-भाजप यांची भविष्यातही युती झाली पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.  

हेमांगी जोशी यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद चाफेकर यांनी प्रास्ताविक केले. अशोक राजहंस यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

आँधी और गांधी 
श्री. आठवले यांनी आपल्या खास शैलीत शीघ्रकाव्य म्हणत ‘ज्ञानविकास’च्या कार्याचे कौतुक केले. त्याचबरोबर ‘दस- पंधरा साल रहेगी नरेंद्र मोदी की आँधी, तो फिर कैसे पंतप्रधान बनेंगे राहुल गांधी’. तसेच गांधी यांना पंतप्रधान होण्यास अजून वेळ असल्याचेही सांगून टाकले.

Web Title: narendra modi NDA government ramdas athawale politics