नासा करणार सौर वादळाचा अभ्यास - शास्त्रज्ञ डॉ. गुहाताकुरता

बलराज पवार
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

सांगली - सूर्याच्या जास्तीत जास्त जवळ जाऊन तेथील वातावरणाचा अभ्यास करण्याची मोहीम ‘नासा’ने आखली आहे. २०१८ च्या ऑक्‍टोबर महिन्यात सुरू होणाऱ्या या मोहिमेत सूर्याच्या वातावरणातील विद्युतभारित कण पृथ्वीकडे कसे येतात आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या सौर वादळाचे काय परिणाम होतील, त्यापासून होणारे नुकसान कसे कमी करता येईल, याचा अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती ‘नासा’मध्ये कार्यरत असलेल्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञ डॉ. मधुलिका गुहाताकुरता यांनी दिली.

सांगलीत सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय अवकाश कार्यशाळेसाठी डॉ. गुहाताकुरता आल्या आहेत. नासाच्या मुख्यालयात त्या हेलिओफिजिसिस्ट म्हणून काम करतात. सूर्य, त्याच्यापासून निघणारे किरण, त्याच्या वातावरणातील विद्युतभारित कण, त्यांचा पृथ्वीशी येणारा संबंध, त्यातून घडणाऱ्या घडामोडींचा अभ्यास त्या करतात. डॉ. मधुलिका गुहाताकुरता म्हणाल्या, ‘‘दोन वर्षांनी ‘नासा’ सूर्याच्या वातावरणात जाऊन तेथील घडामोडींचा अभ्यास करणार आहे. आजवर ग्रहांचा अभ्यास करण्यात येत होता. आता एखाद्या ताऱ्याच्या जवळ जाऊन तेथील वातावरणाचा अभ्यास करण्याची ही पहिलीच वेळ आहे.’’

कल्पना चावलाच्या मोहिमेत सहभाग
मूळच्या कोलकत्याच्या असणाऱ्या डॉ. मधुलिका आठव्या वर्षी मुंबईत आल्या. तेथे शिक्षण घेतल्यानंतर दिल्लीत त्यांनी उच्चशिक्षण घेतले. त्यानंतर अमेरिकेत पीएच.डी.साठी गेल्या. ॲस्ट्रोफिजिक्‍स विषयात पीएच.डी. केल्यानंतर त्या नासामध्ये शास्त्रज्ञ म्हणून सहभागी झाल्या. गोडार्ड आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये त्यांनी काही काळ काम केले. त्या वेळी ‘स्पार्टन २०१’च्या पाच मोहिमांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. १९९७ मध्ये भारताची पहिली महिला अंतराळवीर ठरलेल्या कल्पना चावला यांच्या मोहिमेत डॉ. मधुलिका या अंतराळस्थानकावर काम करत होत्या.

सूर्याचा त्रिमितीय अभ्यास
नासाने सूर्याचा त्रिमितीय अभ्यास करण्याचीही योजना आखली आहे. त्याला ‘स्टेरिओ मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये सूर्याचा सर्वंकष अभ्यास करून त्याच्यापासून निघणारे किरण, विद्युतभारित कण, त्याचे वातावरण यांची निरीक्षणे नोंदवण्यात येणार आहेत. यासाठी दोन स्पेसक्राफ्ट वापरण्यात येणार आहेत.

मंगळावर मानव पाठवणार
नासा आता मंगळावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. मंगळावर जीवसृष्टी वसवता येण्याची शक्‍यता नाही. तेथील वातावरण पृथ्वीसारखे नाही, शिवाय तेथे जीवनावश्‍यक सुविधाही मिळणार नाहीत. अंटार्क्‍टिकावर जसे राहावे लागते तसे तेथे राहावे लागेल, तेही काळापुरते शक्‍य आहे, असे डॉ. मधुलिका म्हणाल्या.

Web Title: NASA will study the solar storm