नगर बॉम्बस्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे 

सूर्यकांत नेटके
गुरुवार, 22 मार्च 2018

नगर : शहरातील मारुती कुरिअर कंपनीच्या येथील माळीवाडा परिसरातील कार्यालयामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या क्रूड बॉम्ब स्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे (दहशतवाद विरोधी पथक) देण्यात आला आहे. नाशिक युनिटचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास अधिकारी असतील. बॉम्बस्फोट झालेल्या मारुती कुरिअर कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण नगर सायबर सेलच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नगर : शहरातील मारुती कुरिअर कंपनीच्या येथील माळीवाडा परिसरातील कार्यालयामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या क्रूड बॉम्ब स्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे (दहशतवाद विरोधी पथक) देण्यात आला आहे. नाशिक युनिटचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे हे तपास अधिकारी असतील. बॉम्बस्फोट झालेल्या मारुती कुरिअर कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण नगर सायबर सेलच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

नगर शहरातील माळीवाडा भागात असलेल्या मारुती कुरिअर कंपनीच्या कार्यालयामध्ये स्फोट झाला. हा स्फोट क्रूड बॉम्बचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी कुरिअर कार्यालयात पार्सल आणून देणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्रही प्रसिद्ध केले आहे.

मानवी (देशी बनावटीचा) बॉम्ब आणि तो पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावे पाठवले जाणार असल्याचे उघड झाल्याने हे दहशतवादी काम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने तपास सुरु केला आहे. पूर्ण पोलिस यंत्रणेचे आणि दहशतवादविरोधी पथकाचेही लक्ष या प्रकराकडे असून राज्याचे पोलिस महासंचालक आणि अप्पर पोलिस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक यांच्या आदेशाने स्फोटाचा तपास नाशिक एटीएसकडे देण्यात आला आहे. त्यामुळे नाशिक युनीटच्या एटीएसचे अधिकारी आज दिवसभर नगरमध्ये होते.

सरकारी विश्रामगृहावर गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची बैठकही झाल्याचे समजते. गुन्ह्याची पद्धत आणि टार्गेट केलेल्या व्यक्तीचा विचार करता या स्फोटासाठी दहशतवादी संघटनांचा यात हात आहे का? या अंगानेही तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले. 

मारुती कुरिअरच्या कार्यालयात महिलेच्या नावे पार्सल आणून दिले असले तरी ते एका व्यक्तीने दिले आहे. त्यामुळे पार्सल देणाऱ्या व्यक्तीचा तपास पोलिसांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने माळीवाडा बसस्थानक, पुणे बसस्थानक परिसर, रेल्वेस्थानक परिसर व मारुती कुरिअर कार्यालयाच्या जवळपासचे सर्व सीसीटीव्ही चित्रीकरण सायबर सेलच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज दिवसभर चित्रीकरण तपासून संशयित व्यक्तीची माहिती मिळवण्याचे काम सुरु होते असे सायबर सेल पोलिसांकडून सांगण्यात आले. अजून तरी बॉम्ब स्फोटाचे धागेदारे हाती लागले नाहीत. 

एलसीबीने नहार यांच्याकडे केली चौकशी 
नगरमध्ये बॉम्बस्फोट झालेल्या वस्तूचे पार्सल पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या नावे पाठवले जाणार होते. त्यामुळे नहार यांच्या जीविताला धोका असल्याचे पोलिसांनी गृहीत धरुन आज नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने नहार यांच्याकडे चौकशी केली. या प्रकाराबाबत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केला नाही असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Nashik ATS to investigate in nagar parcel blast aimed at Sanjay Nahar