सहा द्राक्ष उत्पादकांना नाशिकच्या व्यापाऱ्याने घातला गंडा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

आटपाडी - झरे (ता. आटपाडी) येथील सहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नाशिक येथील व्यापाऱ्याने बनावट धनादेश देऊन ४८ लाख ६८ हजारांना गंडा घातला. याप्रकरणी नाशिक येथील व्यापारी मुश्‍ताक शब्बीर शेख याच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

आटपाडी - झरे (ता. आटपाडी) येथील सहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नाशिक येथील व्यापाऱ्याने बनावट धनादेश देऊन ४८ लाख ६८ हजारांना गंडा घातला. याप्रकरणी नाशिक येथील व्यापारी मुश्‍ताक शब्बीर शेख याच्यावर आटपाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. 

झरे (ता. आटपाडी) येथील लीलाधर किसन गलांडे (वय ३०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या माणिक चमन द्राक्षाचे दोन प्लॉट होते. जानेवारीत नाशिक येथील व्यापारी मुस्ताक शेखची झरे येथे भेट झाली. त्याच्याशी एका प्लॉटचा साठ आणि दुसऱ्या प्लॉटचा पन्नास रुपये प्रति किलो, असा व्यवहार ठरवला. एक ते १५ जानेवारी २०१९ दरम्यान या व्यापाऱ्याने द्राक्षाचा तोडा केला. झरे येथीलच पांडुरंग पुकळे, बाळासो गोरड, रावसाहेब गोरड, अधिकराव हरिबा माने आणि माण येथील अंकुश शामराव माने यांच्या बागांचेही व्यवहार केले. शेखने संबंधित सर्व शेतकऱ्यांचा एकत्रित माल तोडून नेला. 

सर्व शेतकऱ्यांना पांडुरंग पुकळे यांच्या नावाने ४८ लाख ६८ हजारांचा धनादेश दिला. धनादेश दोन वेळा बाउन्स झाला. त्यानंतर व्यापाऱ्याशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला. त्याने सुरवातीला टोलवाटोलवी केली. नंतर मोबाईल बंद केला. सध्या संपर्क होत नसल्यामुळे गलांडे यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात व्यापाऱ्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

फसवणुकीचे यापुर्वीही प्रकार...
द्राक्ष, डाळिंबाच्या हंगामात फसवणुकीचे प्रकार यापुर्वीही घडले आहेत. मार्केट कमिट्यांकडे नोंदणी नसलेल्या व्यापाऱ्यांमार्फत शेतमाल विक्रीचे व्यवहार झाल्याने तासगाव तालुक्‍यात असे प्रकार घडले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik trader Cheat 6 grape growers in Sangli