विद्यार्थी खून प्रकरणातील संशयित पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नातेपुते - पिरळे (ता. माळशिरस) येथील महेश किसन कारंडे या दहावीतील विद्यार्थ्याचा काल (ता. 6) शाळेत खून झाला होता. यातील दोन्ही संशयितांना पोलिसांनी आज (ता. 7) ताब्यात घेतले आहेत. पिरळे येथील समता माध्यमिक विद्यालयात महेश दहावीचे शिक्षण घेत होता. त्याच्याच वर्गातील दोन मित्रांनी त्याला संगणक कक्षात नेऊन ऊस तोडणीच्या कोयत्याने वार करून त्याचा खून केला होता. त्यानंतर दोघे मित्र चुलत्याची मोटारसायकल घेऊन दहिगावमार्गे शिवपुरीवरून निरा वागजला गेले होते. तेथून ते बारामतीला गेले. नातेपुते पोलिसांनी या दोघा संशयितांच्या प्रत्येक नातेवाइकाकडे कसून चौकशी केली. त्यांना आसरा देऊ नका, कोणतीही मदत करू नका, असे बजावले होते. त्यामुळे नातेवाईक व त्यांच्या वडिलांनी दोघांनाही आज सकाळी नातेपुते पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील सतीश गुंजाबा लोखंडे (वय 21) हा सज्ञान असून, दुसरा मित्र अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, मुलीच्या कारणावरून आमची भांडणे झाली होती, तर त्याने एकास अवघड जागी लाथ मारली होती. त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्यावर हा हल्ला केल्याचे कबूल केले. सतीश याने महेशला धरून ठेवले होते, असे त्यांनी सांगितले.
Web Title: natepute news solapur news student murder case suspected arrested