नाथपंथी डवरी गोसावी समाजाचे बोंबाबोंब आंदोलन

शिवाजीराव चौगुले
बुधवार, 11 जुलै 2018

शिराळा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या पाच जणांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालया समोर नाथपंथीय डवरी गोसावी समाज सेवा संघाच्यावतीने भर पावसात बोंबाबोंब आंदोलन केले.

शिराळा : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेल्या पाच जणांच्या हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी शिराळा तहसील कार्यालया समोर नाथपंथीय डवरी गोसावी समाज सेवा संघाच्यावतीने भर पावसात बोंबाबोंब आंदोलन केले.

हा मोर्चा डवरी वसाहत, लक्ष्मी चौक, पोटे चौक, कुरणे गल्ली, गुरुवार पेठ, पुलगल्ली, बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी संघटनेच्यावतीने नायब तहसीलदार के.जी.नाईक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, राईनपडा गावातील लोकांनी मुले पळवणारी टोळी म्हणून मंगळवेढा तालुक्यातील खवे येथील दादाराव भोसले, भारत भोसले, भारत माळवे, आग्रु इंगवले (रा.मानेवाडी) व राजू भोसले (रा.गुंदणगाव) यांची हत्या करण्यात आली. ते लोक भिक्षा मागण्यासाठी गेले असताना त्यांची विचारपूस न करता ग्रामपंचायत कार्यालयात डांबून त्यांची हत्या केली. त्यामुळे त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी.

न्यायासाठी भर पावसात भिजले अन उपस्थित भारावले.
मारेकऱ्यांना फाशी द्या. आम्हाला न्याय द्या. अशी मागणी करता महिलांसह आबालवृद्ध भर पावसात भिजत मोर्च्यात सहभागी झाले होते.त्यांची भाषणे भर पावसात झाली. सर्वांनी भिजत बोंबा बोंब व धरणे आंदोलन केले. त्यांचे भर पावसातील आंदोलन पाहून उपस्थित भारावून गेले.  यावेळी श्रीनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन लगस, प्रवक्ते उत्तम माळवे, गणेश साळुंखे, अनिल बाबर, सुनील शिंदे, अनिल शिंदे, सचिन साळुंखे, अनिल शेळके, सुरेश शिंदे, कैलास चव्हाण यांच्यासह महिला व पुरुष उपस्थित होते.

मागण्या
मृतांच्या वारसांना प्रत्येकी २५लाख देऊन एका व्यक्तीस शासकीय सेवेत घ्यावे.आरोपींस फाशीची शिक्षा द्यावी.कोपर्डीच्या धर्तीवर जलद सहा महिन्यात निकाल लागावा.सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी.डवरी समाज्यास शासकीय ओळखपत्र द्यावे.

Web Title: Nathpanti Dwari Gosavi community protest