नथुराम गोडसे टेररिस्ट : प्रकाश आंबेडकर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून टेररिस्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे. परंतु, तो जर कुठल्या धर्माला फॉलो करत असेल तर तो अख्खा 'धर्म टेररिस्ट' आहे, असे कधी होत नाही, असेदेखील आंबेडकर यांनी म्हटले आहे. 
 

कोल्हापूर : बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नथुराम गोडसे हा व्यक्ती म्हणून टेररिस्ट असल्याचे म्हटले आहे. तसेच कोणालाही कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही, दुसऱ्याचा जीव घ्यायचा तर त्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे. परंतु, तो जर कुठल्या धर्माला फॉलो करत असेल तर तो अख्खा 'धर्म टेररिस्ट' आहे, असे कधी होत नाही, असेदेखील आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बहुजन वंचित आघाडीने विधानसभेची व्यूहरचना आखण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक आज कोल्हापुरात पार पडली. या बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभेच्या नियोजन कोणत्या पद्धतीने असेल हे स्पष्ट केले. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोणत्याही माणसाला धर्म जोडणे चुकीचे आहे. तो हिंदू होता म्हणून टेररिस्ट आहे, असे मी म्हणत नाही. या देशात नथुराम गोडसे हे टेररिस्ट आहे. याचं कारण म्हणजे कोणालाही कोणाचा जीव घेण्याचा अधिकार नाही. दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याला टेररिस्ट म्हटले पाहिजे. 

लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीने उभे केलेल्या उमेदवारांचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाला ? या प्रश्नावर आंबेडकर म्हणाले, "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे मराठा समाजाचे पक्ष आहेत. आम्ही त्याला हात घातलेला नाही. आम्ही फक्त ओबीसी मतदारांना हात घातलेला आहे. पारंपरिक ओबीसी मतदार हा तिसऱ्या आघाडीचा मतदार आहे. मध्यंतरी तिसरी आघाडी नव्हती; त्यावेळेस भाजप हाच पक्ष होता. परंतु, पर्यायी वंचित आघाडी उभी राहिली आणि ओबीसींना चॉईस मिळाला. आम्ही नुकसान केले असे वाटत असेल तर दोघांचेही नुकसान केले आहे.'' 

"आम्हाला कोणीही निवडून येतो म्हणून जमेत धरत नाही. तर राज्य पातळीवर आम्ही बहिष्कृत आहोत. परंतु, राष्ट्रीय पातळीवरदेखील आम्हाला निवडून येतो म्हणून कोणी गृहीत धरत नाही. 23 मे नंतर बराच मोठा बदल घडेल. लोकसभेच्या निवडणुका घासून-पुसून होणार आहेत. त्यामुळे फार मोठी आघाडी कोणाला असेल, असे मला वाटत नाही. जो कोणी निवडून येईल तो फार कमी मतांनी निवडून आलेला असेल. शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल; काय होणार नाही याची उत्सुकता राहील. आज झालेल्या जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत कोणाबरोबर आघाडी न करण्याचा निर्णय या वेळी कार्यकर्त्यांनी घेतला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील 288 जागा आपण स्वबळावर लढवाव्यात, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्त्यांच्या मतांचा विचार करत आहोत,'' असे देखील ते म्हणाले. 

भाजपकडे सत्ता ज्या वेळेस होती त्या वेळेस त्यांना वाटत होतं की आम्ही सर्व राजकीय पक्षांना गिळंकृत केले आहे. तेव्हा कुरघोडी करून आपल्याला पाहिजे ते संविधान आणता येईल असे त्यांना वाटले. परंतु, मतदार इतका मजबूत आहे आणि त्याचे ठाम मत आहे की नवीन संविधानापेक्षा हेच संविधान चांगले आहे. 
- प्रकाश आंबेडकर, नेते, बहुजन वंचित आघाडी 

Web Title: Nathuram Godse Terrorist : Prakash Ambedkar