राष्ट्रीय खेळाडू कपिल बोते याचे निधन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

आष्टा - नगरपालिका ब वर्ग करनिर्धारण अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू कपिल भगवान बोते (वय २३) याचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

आष्टा - नगरपालिका ब वर्ग करनिर्धारण अधिकारी व राष्ट्रीय खेळाडू कपिल भगवान बोते (वय २३) याचे अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे.

आष्टा - सांगली रोडवर सोमवारी (ता. १८) रात्री मोटारसायकल व कार यांच्यात झालेल्या अपघातात डोक्‍याला मार लागल्याने कपिल गंभीर जखमी झाला होता. बेशुद्धावस्थेत उपचारासाठी सांगलीला व नंतर  कऱ्हाड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पाच दिवस कोमात होता. शहरात कपिलसाठी अनेकांनी प्रार्थना केल्या.

रविवारी रात्री उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. कपिल हा आष्टा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व मुख्याध्यापक भगवान बोते यांचा चिरंजीव होता. त्याची नगरपालिका करनिर्धारण (क्‍लास टू) अधिकारीपदी निवड झाली होती. फेब्रुवारीमध्ये राज्य गुप्तवार्ता अधिकारीपदीही निवड झाली होती. नुकताच त्याने भंडारा येथील साकोली येथे करनिर्धार विभागाचा अधिभार घेतला. राज्यसेवा परीक्षेसाठी तो गावी आला होता. सोमवारी रात्री कारंदवाडी येथे रात्री ११ वाजता भरधाव कारने धडक दिली. सांगली, कऱ्हाड येथे उपचार झाले; मात्र रविवारी रात्री त्याचे निधन झाले.

कपिल हा जिगरबाज होता. हातोडा फेक मध्ये राज्य, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात गोल्ड, रौप्य पदके पटकावली आहेत. तहसीलदार  होण्याचे त्याचे स्वप्न होते. रक्षविसर्जन मंगळवारी सकाळी १० वाजता होणार आहे.

जिंकण्यासाठी जन्म...
Born To Win  हा त्याचा व्हॉट्‌सॲप स्टेटस त्याचा सोबती होता. त्यानं जाईल त्या मैदानात विजय मिळवला. महाराष्ट्रात २२ वेळा प्रथम क्रमांक, त्याचबरोबर झारखंड, भोपाळ येथे प्रथम (सुवर्णपदक) राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, चेन्नई, आंध्र प्रदेश (गुंटूर) या राज्यांत रौप्य पदक जिंकले. जिंकण्यासाठी मी हा संदेश स्पर्धा परीक्षेतही कायम ठेवला. त्याची एमपीएससीच्या पाच परीक्षांपैकी दोनमध्ये निवड, तर तीनची मुलाखत दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National player Kapil Bote passed away