कोल्हापुरात नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर

कोल्हापुरात नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर

कोल्हापूर - विद्यार्थ्यांचा शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन व संशोधन वृत्ती वाढीस लागली पाहिजे. देशातील अव्वल संशोधन केंद्रांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश व्हावा, यासाठी येथे लवकरच नॅशनल स्टुडंट रॉकेट लाँचिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्‍यक १०० एकर जागा उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. 

जरगनगर येथील भालचंद्र चिकोडे ग्रंथालय आणि ‘एसडीएनएक्‍स’ संस्थेच्या माध्यमातून एसडीएनएक्‍स इनोव्हेशन लॅब हे महाराष्ट्रातील पहिले अवकाश विकास केंद्र येथे सुरू झाले आहे. त्याच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते. निर्माण चौक येथे हा दिमाखदार सोहळा झाला. दरम्यान, ४ ते १० ऑक्‍टोबरपर्यंत येथून पहिले रॉकेट आकाशात झेपावेल. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्‍यक जागेसाठी तत्काळ कार्यवाहीला प्रारंभ करावा. आवश्‍यक ते सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील म्हणाले.  

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘भारत हा केवळ विविध वस्तूंचे उत्पादन करणारा देश न राहता तो संशोधन करणारा देशही बनला पाहिजे. नवसंशोधक तयार होण्यासाठी लहानपणापासूनच मुलांमध्ये संशोधनाची वृत्ती तयार केली पाहिजे, त्यासाठी एसडीएनएक्‍स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्त्वाची ठरेल. या लॅबमध्ये विद्यार्थ्यांना ३६ तासांचा अभ्यासक्रम असून, रोबोटिक आर, सॅटेलाईट, रॉकेट आदी विविध अवकाशीय उपकरणे घडामोडींबाबत माहिती व प्रशिक्षण प्रात्यक्षिकांसह देण्यात येईल. फिरत्या प्रयोगशाळांसारखे उपक्रमही राबविण्यात येतील.’’

‘‘अंतराळ संशोधनात भारताने केलेली कामगिरी अद्वितीय असून, भारतात प्रचंड बौद्धिक, तांत्रिक क्षमता आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विकसित करून त्याचा देशाच्या विकासासाठी उपयोग होणे महत्त्वाचे आहे.’’ 

- पद्मश्री डॉ. शिवराम भोजे

(कै.) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, ‘‘समाजातील वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ करण्यासाठी एसडीएनएक्‍स इनोव्हेशन लॅब अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. पहिल्या टप्प्यात सहावी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन वयोगटांतील प्रत्येकी १०० मुलांसाठी १० ते १५ जून या कालावधीत प्रवेश दिला जाणार आहे. कार्यशाळेत रोबोटीक आर्म, ड्रोन, रॉकेट, सॅटेलाईट असे विविध १२ प्रकल्प शिकविले जाणार आहेत. या कार्यशाळेसाठी नाममात्र शुल्क असेल. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवलत असेल.’’

अंजली पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, माजी खासदार धनंजय महाडिक, ‘इस्त्रो’चे माजी प्रकल्प संचालक टी. के. सुंदरमूर्ती, ‘एसडीएनएक्‍स’चे संस्थापक संजय राठी, ‘डीआरडीओ’चे माजी संशोधक वरदप्रसाद मुरली, नासा हनीवेल्सच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, संशोधक लुकनाथन हायस, गोविंद यादव, मिलाफ मुखर्जी आदी उपस्थित होते. 

कुतूहल अन्‌ रॉकेट..!
कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच येथे ताशी एक हजार ८०० किलोमीटर वेग असणाऱ्या रॉकेटचे लाँचिंग झाले. आकाशात झेपावणारे हे रॉकेट पाहण्यासाठी बालमित्रांनी मोठी गर्दी केली होती. रॉकेट आकाशात झेप घेताच अनेक प्रश्‍नांचं कुतूहल मनात घेऊन आलेल्या या बालमित्रांनी जणू आनंदोत्सवच साजरा केला. केवळ बालमित्रच नव्हे, तर ज्येष्ठांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. रॉकेटबरोबरच एरोमॉडेलिंगची प्रात्यक्षिकेही या वेळी सादर झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com