नैसर्गिक शेतीमालाची वाढतेय मागणी

परशुराम कोकणे
रविवार, 20 मे 2018

कीटकनाशक फवारणी करून पिकवलेला शेतीमाल आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी वयात आजाराचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या शेतीमालाचे महत्त्व लोकांना पटत असून मागणी वाढली आहे. 
- सिद्धाराम मगे, शेतकरी

सोलापूर : नैसर्गिक शेतीमालाचे महत्त्व आता साऱ्यांनाच पटू लागल्याने मागणी वाढली आहे. शिरपनहळ्ळी (ता. दक्षिण सोलापूर) येथील शेतकरी सिद्धाराम मगे यांनी सुरू केलेल्या नैसर्गिक शेतीमालाच्या फिरत्या विक्री केंद्राला सोलापूरकरांनी प्रतिसाद दिला आहे. 

मगे यांची शिरपनहळ्ळी येथे सात एकर शेती आहे. निंबर्गीचे शेतकरी धर्मराज बिराजदार यांच्या नैसर्गिक द्राक्षांचे मार्केटिंग केल्यानंतर श्री. मगे यांना नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या शेतीमालाच्या विक्रीसाठी फिरते वाहन चालू करण्याची कल्पना सुचली.

सोलापूर जिल्हा गोसेवा विभाग यांच्या प्रोत्साहनातून छोटे चारचाकी वाहन घेऊन नैसर्गिक मालाचे फिरते विक्री केंद्र चालू केले. आयुष्यमान भारत नैसर्गिक शेतीमाल विक्री केंद्र असे नाव दिले आहे. त्यांच्याकडे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ज्वारी, गहू, कडधान्ये, गूळ, काकवी, लसूण, कांदा, चिंच, बेदाणा आदी माल विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. 

शहरात बाळीवेस, गोविंदश्री मंगल कार्यालय, दावत चौक, सात रस्ता या ठिकाणी श्री. मगे हे वाहन घेऊन जातात आणि नैसर्गिक मालाची विक्री करत आहेत. सोलापूर परिसरातील शेतकऱ्यांकडून शेतीमाल घेतला जातो. शहरातील विविध ठिकाणी हा माल विकला जात असून प्रतिसाद मिळत असल्याचे श्री. मगे यांनी सांगितले. 

कीटकनाशक फवारणी करून पिकवलेला शेतीमाल आरोग्यासाठी हानिकारक आहे. कमी वयात आजाराचे प्रमाण वाढले आहे. नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या जाणाऱ्या शेतीमालाचे महत्त्व लोकांना पटत असून मागणी वाढली आहे. 
- सिद्धाराम मगे, शेतकरी

Web Title: natural agriculture products demand