नैसर्गिक वारसा डोळ्यांदेखत लोप पावतोय

सुधाकर काशीद
मंगळवार, 23 मे 2017

त्र्यंबोली टेकडीची स्थिती - मोकळ्या हवेचे ठिकाण इमारतींमुळे बंदिस्त
कोल्हापूर - या टेकडीवर फक्त हवा आणि हवाच खेळायची. दमून-भागून येऊन इथं क्षणभर टेकणाऱ्याला ही हवा ताजेतवानी करून सोडायची. पूर्वेला पार हेर्ल्यापर्यंत आणि पश्‍चिमेला पार आंबेवाडीपर्यंतच्या परिसरातली हिरवीगार शेती इथं एका नजरेच्या टप्प्यात यायची. रात्री टेकडीवर चांदण्यात उभं राहिलं तर अथांग पसरलेल्या अवकाशाच्या तुलनेत आपण नखाएवढंही नाही, याची जाणीव ही टेकडी करून द्यायची..

त्र्यंबोली टेकडीची स्थिती - मोकळ्या हवेचे ठिकाण इमारतींमुळे बंदिस्त
कोल्हापूर - या टेकडीवर फक्त हवा आणि हवाच खेळायची. दमून-भागून येऊन इथं क्षणभर टेकणाऱ्याला ही हवा ताजेतवानी करून सोडायची. पूर्वेला पार हेर्ल्यापर्यंत आणि पश्‍चिमेला पार आंबेवाडीपर्यंतच्या परिसरातली हिरवीगार शेती इथं एका नजरेच्या टप्प्यात यायची. रात्री टेकडीवर चांदण्यात उभं राहिलं तर अथांग पसरलेल्या अवकाशाच्या तुलनेत आपण नखाएवढंही नाही, याची जाणीव ही टेकडी करून द्यायची..

आज या टेकडीवर वाऱ्याला यायलाही दहा ठिकाणी ठेचकळायला लागते. टेकडी नावालाच आहे; पण टेकडीवरच्या बांधकामाआड टेकडीच दडली आहे. निसर्गाने भरभरून दिलेला हा टेकडीचा वारसा आपण सर्वांनी मिळून गाडून टाकला आहे. ज्या ठिकाणी फक्त स्वच्छ हवाच खेळायची, ती टेकडी आता स्वतःच गुदमरून गेली आहे. निसर्गाने दिलेला एक सुंदर वारसा आपण जपू शकलो नाही, तर त्याची कशी वाट लागते, याचे उदाहरण ही टेकडी ठरली आहे. 

कोल्हापूरच्या पूर्वेला त्र्यंबोली, पश्‍चिमेला चंबुखडी, दक्षिणेला पुईखडी आणि उत्तरेला सादळे-मादळ्याची टेकडी. २४ तास वाहणारा गार वारा, पावसाळ्यात झोडपून काढणारा पाऊस, रात्री जाणवणारी नीरव शांतता यामुळे या टेकड्या म्हणजे कोल्हापूरकरांना एक वरदानच. निसर्गाचा मनमुराद आनंद घ्या, असंच जणू या टेकड्या खुणवत राहायच्या. 

यापैकी त्र्यंबोली टेकडीवर तर त्र्यंबोली देवीचे अधिष्ठान. आता आपण बहुतेकजण पाहतो ती एकच टेकडी; पण जवळच बाजूला अशाच दोन टेकड्या आहेत. त्यांपैकी एका टेकडीवर राजाराम बटालियन होते. हेच बटालियन विसर्जित होऊन पुढे ते मराठा लाईट इन्फ्रंट्री म्हणून ओळखले जाऊ लागले. प्रत्येक युद्धात हे बटालियन शौर्याची परिसीमा गाजवू लागले. हीच टेकडी छत्रपती शाहू महाराजांनाही प्रिय. त्यांनी या टेकडीस त्यांचे इंग्लंड दौऱ्यातील सहकारी क्‍लॉड यांचे नाव दिले व क्‍लॉड हिल असेही या टेकडीस काही काळ ओळखले जाऊ लागले. या टेकडीवरची फक्त शुद्ध हवा हेच औषध मानून या टेकडीवर ब्रिटिशांनी काही काळ क्षयरोग उपचार केंद्र 
सुरू केले.

एका टेकडीवर त्र्यंबोली मंदिर, दुसऱ्या क्‍लॉड हिल या टेकडीवर लष्करी तळ, तर तिसऱ्या छोट्या टेकडीवर पाण्याची टाकी उभारली गेली. छत्रपती शहाजी यांचे मूळ नाव विक्रमसिंह. ते शाहू महाराजांच्या कन्या आक्कासाहेब महाराज यांचे चिरंजीव. त्यांना कोल्हापुरात दत्तक घेतल्यानंतर त्यांचे नाव विक्रमसिंह ऐवजी शहाजीराजे झाले; पण विक्रमसिंह या नावाने टेकडीच्या तळाला विक्रमनगर वसले गेले. 

याच टेकडीवर त्र्यंबोलीची यात्रा भरते. शेजारच्या टेकडीवर लष्करात भरती होण्यासाठी मराठमोळ्या तरुणांची जत्रा फुलते. या टेकडीला धार्मिक इतिहास आहे. बटालियनमुळे शौर्याचाही इतिहास आहे. भन्नाट वारा, मोकळ्या टेकड्यांमुळे स्वच्छ हवा म्हणजे पर्यावरणाचा लख्ख वारसा आहे; पण आताची परिस्थिती खूप वेगळी आहे. नैसर्गिक टेकडीवर पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचा पराक्रम झाला आहे. टेकडीवर धर्मशाळा, एक खासगी शाळा, दुकानगाळे उभे करून टेकडीलाच खुजे करून टाकले आहे. 

टेकडीवर एक सुंदर बॅन्ड स्टॅंड होता, तेथे सिमेंटच्या १६ फुटांची गणपती मूर्ती बसवली आहे. सिमेंटचे रंग उडालेले, टवके उडालेले, तसेच मावळ्यांचे पुतळे दयनीय अवस्थेत उभे आहेत. धर्मशाळा भानगडीची शाळा झाली आहे. टेकडीवर वाऱ्याचा झोत नव्हे, तर झुळुकही येत नाही, अशी परिस्थिती आहे.
वारसा जपला पाहिजे हे खरे आहे; पण डोळ्यांदेखत टेकडीचा नैसर्गिक वारसा ढासळला जातोय, हे कटू सत्य आहे.

नैसर्गिक वारसा गमावला
त्र्यंबोली टेकडीची सध्याची ही अवस्था आहे. केवळ जुने वाडे, किल्ले, मंदिर म्हणजे वारसास्थळे या समजुतीत आपण राहिल्याने हा निसर्गाने दिलेला वारसा आपण गमावून बसलो आहोत.

Web Title: Natural heritage is being overlooked