नाट्य परिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी कांबळी विरूद्ध कोल्हे यांच्यात लढत

रजनीश जोशी
सोमवार, 26 मार्च 2018

''निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. निकालानंतर कार्यकारिणी व पदाधिकारी कोण होणार हे कळणार असले तरी मोहन जोशी गटाचे पारडे जड असल्याचा कल सकृतदर्शनी दिसत आहे''. 
- जयप्रकाश कुलकर्णी, उमेदवार, कार्यकारिणी सदस्य, सोलापूर 

सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी नवनाथ तथा प्रसाद मच्छिंद्र कांबळी विरूद्ध अमोल रामसिंग कोल्हे यांच्यात लढत होणार असल्याचे आज निश्‍चित झाले. सोलापूरातून निवडून गेलेल्या नियामक मंडळाच्या चार सदस्यांना कार्यकारिणीतील लढतीसाठी अंतिम पात्र उमेदवार यादीत स्थान मिळाले आहे. सहा एप्रिलला मतदान व मतमोजणी होऊन निकाल स्पष्ट होईल. 

पंढरपूरचे दिलीप कोरके यांना सहकार्यवाह पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. या तीन पदांसाठी कोरकेंसह सुरेश गायधनी, सुनील ढगे, अशोक ढेरे, सतीश लोटके, दीपा क्षीरसागर अशा सहाजणांमध्ये लढत होईल. सोलापूरचे जयप्रकाश कुलकर्णी, आनंद खरबस आणि चेतन केदार या तिघांना कार्यकारिणी सदस्य पदासाठी उमेदवारी मिळाली आहे. कार्यकारिणी सदस्य पदाच्या जागा 11 असून त्यासाठी 21 उमेदवारांमध्ये लढत होईल. 

मोहन जोशी यांच्या गटातील वीणा लोकूर यांनी बंडखोरी केली असून, त्यांनी विजय गोखले व जगन्नाथ चितळे यांच्याशी कोषाध्यक्ष पदासाठी दोन हात करायचे ठरवले आहे. 31 ही 'मॅजिक फिगर' असून, दोन्ही गटातील उमेदवारी मिळालेल्या 38 जणांबरोबरच अन्य 22 सदस्यांच्या हाती इच्छुकांचे भवितव्य आहे. मतदानप्रक्रिया गुप्त पद्धतीने असल्याने क्रॉस वोटिंग होऊन निकाल काहीही लागू शकतो. त्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. 

संमेलनाध्यक्षपदावर डोळा 

प्रसाद कांबळी आणि मोहन जोशी यांच्या गटातच थेट निवडणूक होणार असल्याने ज्यांचे जास्त उमेदवार निवडून येतील, त्यांच्या हाती नाट्य परिषदेची सूत्रे राहतील. मोहन जोशी यांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद हवे असल्याने त्यांनी जाणूनबुजून निवडणूक लढवली नसल्याचे बोलले जाते. या पार्श्‍वभूमीवर कांबळी गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडून आल्यास मोहन जोशींना नाट्य परिषदेचे अध्यक्षपद तर मिळणार नाहीच, पण संमेलनाध्यक्ष पदही मिळणे दुरापास्त आहे. "तेलही गेले, तूपही गेले' अशी त्यांची स्थिती होईल.

Web Title: Natya Parishad Election for President Kambli verses Kolhe