#NavDurga योग्य निर्णयक्षमतेतून यशाची भरारी घ्या - अरुंधती महाडिक

#NavDurga योग्य निर्णयक्षमतेतून यशाची भरारी घ्या - अरुंधती महाडिक

‘‘पुराणकाळापासून ते आधुनिक काळापर्यंत स्त्रियांमध्ये उपजतच गुण दिसतात. त्यापैकी महत्त्वाचा गुण म्हणजे ‘निर्णयक्षमता’. अभ्यासपूर्ण योग्य निर्णयाद्वारेच तुम्ही यशाच्या शिखरावर उंच भरारी मारू शकता,’’ असे मत भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, ‘‘प्रत्येक स्त्रीला देवाने वेगळी शक्ती प्रदान केली आहे. स्त्री मूलतः सृजनशील आहे. नवनिर्मितीची ताकदच तिला निसर्गाने दिली आहे. प्रत्येक स्त्रीला संघर्ष हा करावाच लागतो, मात्र प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती परिस्थिती बदलता येते. हा विश्‍वास होता म्हणूनच भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली व महिलांना सक्षम करण्याच्या हेतूने पावले टाकली.’’ 

भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना त्या म्हणाल्या, ‘‘संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी काही विचार बिंबवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यांनी स्वतःचा सन्मान करण्यासोबतच सहकारी महिलांचा सन्मान केला. संघटित होऊन कार्य केले तर कोणतीही लढाई त्या जिंकू शकतात.

साधारण सहा वर्षांपूर्वी काहीच महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन काम करत होत्या. मात्र त्याची तीव्रता कमी होती. अशा वेळी सुरुवातीला लोणची, पापड, विविध प्रकारचे पदार्थ यांच्यापासून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर दिला. स्त्री ज्यावेळी कमवू लागते, त्यावेळी तिचा आत्मविश्‍वास दुणावतो. हे जाणवल्यानंतर त्यांना बाजारपेठही उपलब्ध करून दिली. केवळ कोल्हापूरपुरती बाजारपेठ मर्यादित न ठेवता आज महाराष्ट्रासह बाहेरही या उत्पादनांना मागणी वाढत आहे.’’

 नवरात्रोत्सवाविषयी त्या म्हणाल्या, ‘‘या ९ दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा काळ एकूणच महिलांसाठी सकारात्मक पद्धतीने सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत. धार्मिक कार्यक्रमातूनच लोकांचे नाते घट्ट होते.’’

कोल्हापूरच्या पर्यटनाच्या दृष्टीने नवरात्रोत्सव काळात प्रयत्न व्हायला हवेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूरचा इतिहास जगभर पोहोचवू शकतो. कोल्हापूर परिसराची माहिती पुस्तिका मंदिर परिसरात तसेच इतर ठिकाणी उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  

संस्थेतर्फे विविध उपक्रम
महिला व मुलांसाठी आरोग्य शिबिर व मार्गदर्शन, हस्ताक्षर सुधारणा कार्यशाळा, निबंध, वक्‍तृत्व स्पर्धा, कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण, पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग सखी कचरापेटी, किशोरवयीन मुलींसाठी ‘कळी उमलताना’ उपक्रमातून मार्गदर्शन, स्त्री-भ्रूणहत्या विरोधी उपक्रम, होळी सणावेळी शेणी व पोळी दान, युवती मंचच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यापीठातील अभ्यासक्रमांची माहिती देऊन स्वावलंबनाचा धडा, वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी गावोगावी वाचनालये सुरू केली आहेत. 

अरुंधती महाडिक सांगतात...

  •  महिलांकडे बचतीचा गुण
  •  महिलांनी कौशल्ये ओळखून व्यवसाय करावा
  •  आधुनिक युगात वावरताना संस्कार महत्त्वाचे
  •  बदल स्वीकारणे गरजेचे
  •  सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com