#NavDurga गिर्यारोहणातील प्रवास ठरला झिरो तो हिरो! - खुशी कांबोज

#NavDurga गिर्यारोहणातील प्रवास ठरला झिरो तो हिरो! - खुशी कांबोज

गिर्यारोहणातील माझे ‘नॉलेज’ झिरो होते. माझ्या भावाचे २०११ ला निधन झाले. त्याला आदरांजली वाहण्यासाठी वडील विनोद कांबोज यांच्यासह कळकराय शिखरावर यशस्वी चढाई करण्याचे ठरविले. कमी वयात शिखर सर केल्याची नोंद माझ्या नावावर झाली. माझ्या रक्तात गिर्यारोहण असून हेच माझे पॅशन असल्याची जाणीव तीव्र झाली.

हिमालयातील हनुमान तिब्बा, शितीधर, देवतिब्बा, नोरबू माऊंटेनवर यशस्वी चढाई केली. कोल्हापुरातून २०२०ला माऊंट एव्हरेस्टची चढाई करण्यासाठी पहिली तुकडी घेऊनजाण्याचा मानस आहे, गिर्यारोहक खुशी कांबोज गिर्यारोहणातील अनुभव सांगत भविष्यातील प्लॅन सांगत होती. 

विनोद कांबोज यांना गिर्यारोहणाची आवड. त्याच वाटेवर खुशीची पावले आहेत. सह्याद्रीतील काळाकभिन्न कातळ ते पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित हिमालयातील शिखरांची तिने चढाई यशस्वीरीत्या केली आहे. कडाक्‍याची थंडी व हिमवृष्टीतील तिचे शिखरांच्या चढाईचे रोमांचक अनुभव उलगडत तिने संवाद साधला.

खुशी म्हणाली, ‘‘कळकराय शिखराच्या यशस्वी चढाईनंतर माझे ध्येय निश्‍चित झाले. पुढे सह्याद्री पर्वतरांगेतील अवघड अलंग मदन आणि कुलंग शिखरे सर करण्याचा निश्‍चय केला. खडतर मार्ग व टेक्‍निकल क्‍लायंबिंगच्या साह्याने मी तो सर केला. २०१३ला खाडा पार्शी शिखरही सर केले. साडेतीन हजार फूट दरी असणाऱ्या या शिखराची चढाई करणे जिकिरीचे होते. मनावर कोणतेही दडपण न घेता चढाई केली. त्यानंतर नेपाळ हिमालयातील माऊंट एव्हेरस्ट बेस कॅम्प ट्रेक करण्याचे वेध लागले. वडील विनोद कांबोज मला त्यासाठी प्रोत्साहन देत होते. बेस कॅम्प यशस्वीरीत्या पूर्ण करून दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातील मी पहिली तरुणी ठरले. या अनुभवाच्या जोरावर माझी मुंबईतील टीममध्ये निवड झाली.’’ 

ती म्हणाली, ‘‘हनुमान तिब्बा (१९ हजार ४५० फूट) व शितीधरवर (१७ हजार २४४ फूट) यशस्वी चढाई करून महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरले. हिमालयातील गिर्यारोहणाचे मला वेध लागले. देव तिब्बा (२० हजार १ फूट) व नोरबूची (१९ हजार २४४ फूट) चढाई केली. ही दोन्ही शिखरे सर करणारी मी पहिली मुलगी ठरले. बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्स अतिशय खडतर व अवघड मानला जातो. तो मी वयाच्या सोळाव्या वर्षीच ‘ए’ ग्रेडने पूर्ण केला. जूनमध्ये नंदादेवी बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केला. मी स्वत: कधीच मुलगी आहे, मला हे जमेल की नाही, याचा विचार केला नाही. कठोर परिश्रमाच्या जोरावर अशक्‍य असे काहीच नाही, हा माझा अनुभव आहे.’’ 

खुशी म्हणते...

  • माझे पॅशन हेच माझे करिअर
  • अमदाब्लम माऊंटेन सर करून पहिली भारतीय महिला होणार 
  • स्वत:ला आजमावण्यासाठी गिर्यारोहण क्षेत्रात या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com