#Navdurga विचारांच्या कक्षा व्यापक करा - मधुरिमाराजे

#Navdurga विचारांच्या कक्षा व्यापक करा - मधुरिमाराजे

‘‘मजा-मस्ती म्हणजे आयुष्य नव्हे. स्वतःच्या विचारांच्या कक्षा व्यापक करा, त्यामुळे मजा-मस्तीच्या मागे लागू नका. चांगलं शिकण्याच्या मागे लागा म्हणजे आपोआपच मजा-मस्ती आपल्या मागे येईल. प्रत्येक गोष्टीची परिपूर्ण माहिती असेल तर आपण कोणतेही यश संपादन करू शकतो,’’ असे स्पष्ट मत मधुरिमाराजे छत्रपती यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, ‘‘घरातील महिलेने आपल्या मुलाला आपल्या घरातील स्त्रियांसह प्रत्येक महिलेचा आदर करण्याचे बाळकडू दिले तर समाजात विघातक घटना घडणार नाहीत. महिलांनी स्वतःच्या क्षमता ओळखून स्वतःला सक्षम करायला हवे.’’ 

मधुरिमाराजे म्हणाल्या, ‘‘स्त्री कोणतेही काम करू शकते. जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिचे निर्णय सार्थ ठरवू शकते, एवढी ती सक्षम आहे. महिलाच परिवर्तन घडवितात. आईचे अनुकरण मुले करतात. मुलांवर संस्कार करताना महिलांनी सजगतेने वागावे, तसेच प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही, ही गोष्ट लहान मुलांच्या मनावर बिंबवली पाहिजे. मुलांना प्रत्येक गोष्ट स्वीकारायला शिकविले पाहिजे. त्यांना नकारात्मक गोष्टी स्वीकारून त्यातून भविष्य कसे सकारात्मक जगता येईल, याकडे स्त्रीने लक्ष द्यायला हवे. तसेच सोशल मीडियाचा अतिवापर न करता त्याचा उपयोग तिने चांगल्या कार्यासाठी केल्यास ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते.’’

‘‘पाश्‍चात्य संस्कृतीचे अनुकरण करताना महिलांनी स्वतःची परंपरागत संस्कृतीही जपली पाहिजे, हाच खरा स्त्रीत्वाचा खरा गुण आहे. विचाराने प्रगतिशील असणे गरजेचे आहे. तुमचे मन व विचार चांगले असतील तर कोणतीही समस्या येणार नाही. सोशल मीडियाच्या आहारी न जाता त्याचा योग्य तो वापर करायला शिकले पाहिजे,’’

- मधुरिमाराजे

सण-समारंभाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक सणाला एक वैज्ञानिक कारण आहे. हे सण-समारंभ विदेशात कोठेही सापडणार नाहीत, हाच आपला अनमोल ठेवा आहे म्हणून त्याचे महत्त्व समजून घेऊन सण-समारंभ साजरे व्हायला हवेत.’’

मधुरिमाराजे म्हणाल्या...

  •  शासनाने स्वच्छतागृहे बांधून त्यांची स्वच्छताही ठेवली पाहिजे.
  •  प्रथा-परंपरांमुळेच आपण समृद्ध. 
  •  सण-समारंभाचा आधुनिक संस्कृतीशी योग्य ताळमेळ राखला जावा.
  •  महिलांना महिलाच त्रास देतात, ही परिस्थिती बदलायला हवी.
     

महिला व युवा पिढीच कोल्हापूरचा ठसा उमटवेल 
नवरात्रोत्सव काळात लाखो भाविक कोल्हापुरात येतात. पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांच्या संख्येत वाढ करायची असेल तर युवा पिढीला व महिलांना यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. सध्याच्या युवा पिढीला करवीरनगरीचा इतिहास माहीत आहे. त्यांनी पर्यटकांना गाईड करायचे काम केले व महिलांनी एकत्रित येऊन पर्यटकांसाठी कोल्हापुरी खासियतचे पदार्थ तयार केले तर कोल्हापूरची संस्कृती जगाला कळेल. त्यातून अर्थार्जनाचा नवा व्यवसाय वाढीस लागेल. शिवाय, शहरातील लोकांनी घरातच ‘ब्रेड अँड ब्रेकफास्ट’ची व्यवस्था केल्यास पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर नावारूपाला येईल, असा विश्‍वासही मधुरिमाराजे यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com