#NavDurga ग्लोबल होण्यासाठी उंबरा ओलांडा : नवोदिताराजे घाटगे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018

नवोदिताराजे घाटगे या राजर्षी छत्रपती शाहूंच्या जनक घराण्याच्या स्नूषा. त्या ग्वाल्हेर घराण्यातील. एम.एस्सी. मायक्रोबायॉलॉजीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. अभ्यासातून मुद्देसूद मांडणी करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे.

‘‘महिलांना आर्थिक साक्षर केल्यास कुटुंबात सौख्य नांदते. म्हशीचे शेण काढण्यापासून शेतीतील कामे महिलाच करतात. शेतीपूरक व्यवसायातून त्यांचे सबलीकरण करणे अवघड नाही. ‘सोशल कनेक्‍टिव्हिटी’तून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर महिलांच्या विश्‍वाचा परीघ बदलू शकतो. महिलांना ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी आपणच त्यांचा उंबरा ओलांडला पाहिजे,’’ अशी प्रामाणिक अपेक्षा जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्ष नवोदिताराजे समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केली.

नवोदिताराजे घाटगे या राजर्षी छत्रपती शाहूंच्या जनक घराण्याच्या स्नूषा. त्या ग्वाल्हेर घराण्यातील. एम.एस्सी. मायक्रोबायॉलॉजीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे. अभ्यासातून मुद्देसूद मांडणी करणे हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य आहे. केलेले काम फुगवून सांगण्यापेक्षा ‘कन्स्ट्रक्‍टिव्ह’ कामाला त्या प्राधान्य देतात. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंहराजे घाटगे यांच्याकडून समाजकारणाचे धडे त्यांनी घेतले. त्यांनी जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त पाच, हृदयविकार २१ महिलांवर शस्त्रक्रिया केली आहे. जनरल सर्जरी ४९ महिलांची झाली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून ११ महिलांना आर्थिक आधार दिला आहे. शाहू दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. त्यांनी पायाला भिंगरी लावून कागल तालुक्‍यातील गावांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. 

त्या म्हणाल्या, ‘‘पितरांना नैवेद्य देण्यापेक्षा होतकरू कुटुंबीयांच्या तोंडात घास जाणे, हीच पुण्याई आहे. ग्रामीण मुलींच्या शिक्षणाला दहावी-बारावीत पूर्णविराम मिळतो. टोमॅटो सॉस, बेकरी पदार्थ, पनीर बनविण्यासह ब्युटी पार्लर, हस्तकला कौशल्याधारित व्यवसायांचे प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षमतेसाठी बळ दिले आहे. महिलांसाठी कॅन्सर शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. कागल, मुरगूड, गडहिंग्लज येथे महिलांच्या अडचणीही समजून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. 

राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वही व स्कुल किट वाटप केले असून दिव्यांगांना जयपूर फूट दिले आहेत. वीरमाता-वीरपत्नी, ऊस उत्पादक, दूध उत्पादक महिलांच्या सत्कारातून त्यांचा सन्मान केला आहे. शाहू दूध संघ दूध उत्पादक महिलेच्या खात्यावर जमा करतो. मुला-मुलींनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे यासाठी एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे.’’

नवोदिताराजे म्हणतात

  •  आरोग्य विभागातर्फे जनतेच्या सेवेस सुरुवात
  •  विद्यार्थ्यांना सायन्स किटचे वाटप
  •  ई-लर्निंगच्या माध्यमातून धडे 
  •  आरोग्य शिबिरांना महिलांचा प्रतिसाद
Web Title: NavDurga Navoditaraje Ghatge comment