#NavDurga ‘स्त्री’ सक्षम; तरच कुटुंब, समाज सक्षम : प्रतिमा पाटील

#NavDurga ‘स्त्री’ सक्षम; तरच कुटुंब, समाज सक्षम : प्रतिमा पाटील

कोल्हापूर - ‘‘महिलाच समाजाच्या केंद्रबिंदू आहेत. ‘स्त्री’ सक्षम झाली तर कुटुंब सक्षम होईल. आणि समाजही सक्षम होईल. त्यामुळे स्त्रीने सक्षम होणे गरजेचे आहे’’, असे प्रतिपादन प्रतिमा सतेज पाटील सोशल वेल्‍फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा प्रतिमा पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना केले. त्या म्हणाल्या,‘‘प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेतच. पण सर्वच क्षेत्रांत यशस्वी व्हायचे असेल तर तिला सर्व विषयांचे परिपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. ते मिळवण्यासाठी तिने प्रयत्न करावेत.’’

संस्थेची माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘‘महिला मुळातच काटकसरी, सहनशील, चिकाटी, जिद्दी आणि कष्टाळू असतात. त्यामुळे जर महिलांना संधी मिळाली तर त्या संधीचे सोने करून यशाचा ठसा उमटवू शकतात. म्हणूनच आम्ही महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या संस्थेची स्थापना केली. महिला दिनानिमित्त आम्ही गृहिणी महोत्सवाचे आयोजन करून त्यांच्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देतो.’’

महिलांच्या कौटुंबिक जबाबदारीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘प्रत्येक स्त्रीने कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे. ती आदर्श पत्नी, माता झाली तरच ती प्रगती करू शकते. आजची युवा पिढी भरकटत चालली आहे. ते रोखायचे असेल तर त्यांच्यावर लहान वयातच योग्य संस्कार करावेत. कुटुंबाचे आरोग्य स्त्रीच्या हाती असते. त्यामुळे तिला सकस आहाराचे संपूर्ण ज्ञान हवे. यासाठीच संस्थेतर्फे सकस आहाराचे मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन केले जाते. बहुतांश महिला या ॲनिमिक आहेत. त्यासाठी महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे 
आवश्‍यक आहे.’’

प्रतिमा पाटील सांगतात

  •  महिला उपजतच सक्षम

  •  महिलांनी व्‍यक्‍तिमत्त्‍व विकासावर भर द्यावा

  •  मुलांवर योग्य संस्कार ही महिलेची जबाबदारी

  •  ग्रामीण भागात अजूनही साक्षरतेची गरज

  •  ५० टक्के आरक्षणामुळे राजकारणात महिलांची आघाडी.

संस्थेच्या वतीने ‘क्‍लीन कोल्हापूर’ हा उपक्रम राबविला जातो. त्या अनुषंगाने शहरातील विविध मंदिरे तसेच परिसराची स्वच्छता केली जाते. कोल्हापूर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असून प्रत्येकाने स्वच्छता राखली तर आपण निरोगी आयुष्य जगू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

संस्थेचे उपक्रम  
सणासुदीच्या काळात महिलांसाठी स्वच्छतागृहे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता रांगोळी, खाद्यपदार्थांच्या स्पर्धा, कौशल्य आधारित कार्यशाळा, आरोग्य शिबिरे, बालसंस्कार शिबिरे, कचरा व्यवस्थापन प्रशिक्षण, किचन गार्डनिंग, कचऱ्यापासून खतनिर्मिती, महिलांसाठी क्रिकेट स्पर्धा, मातृत्व व आरोग्यसंदर्भात व्याख्याने, मोफत टू व्हीलर लर्निंग लायसन्स कॅम्प, करिअर मार्गदर्शन आदी उपक्रम राबविले जात असल्याचे सौ. पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com