#NavDurga परिस्थितीवरही मात करणाऱ्या ‘सीमा’!

Seema-Kashid
Seema-Kashid

सातारा - पतीचे अकाली निधन... कुटुंबावर कर्जाचा डोंगर... मुलांच्या शिक्षणाचा खर्च... भविष्याची चिंता... असे एक ना अनेक प्रश्‍न उभे होते. तरीही त्या डगमगल्या नाहीत. व्यवसाय करून मुलांना उच्चशिक्षित करताना कुटुंबाची घडीही व्यवस्थित बसवली. 

साताऱ्यातील कोडोली एमआयडीत राहणाऱ्या सीमा काशीद असे या माउलीचे नाव. त्या मूळच्या विसापूरच्या. घरची परिस्थिती बेताची असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही त्यांनी शेतात मजुरी केली. १९९४ मध्ये खेड नांदगिरी (ता. कोरेगाव) येथील शिवाजी काशीद यांच्याशी त्यांचा विवाह झाला. औरंगाबाद येथील बजाज कंपनीत ते नोकरीला होते. मात्र, तेथे दंगल झाल्याने त्यांची साताऱ्याला बदली झाली. कालांतराने साताऱ्यातील कंपनीही बंद झाली. त्यामुळे १९९८ पासून शिवाजी यांनी पेंटिंगची कामे सुरू केली.

नंतर पेंटिंगचे ठेके घेतले. सीमा यांनी ब्युटी पार्लर सुरू केले. याचदरम्यान काशीद दांपत्याला दोन मुले झाली. २००१ मध्ये या दांपत्याने कर्ज काढून जागा घेऊन घर बांधले. पेंटिंग व्यवसायाच्या माध्यमातून या दांपत्याचा संसार फुलत गेला. मात्र, नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते. २०११ मध्ये शिवाजी यांना कर्करोग झाल्याचे निदान झाल्याने कुटुंब कोलमडून गेले. पै-पाहुण्यांकडून तसेच हातउसने पैसे घेऊन उपचारासाठी लाखो रुपये खर्च करूनही काही उपयोग न झाल्याने त्यांचे वर्षातच निधन झाले. 

या धक्‍क्‍यामुळे सीमा या मानसिक तणावात गेल्या. त्यांना सावरण्यासाठी काही कालावधी गेला. संसाराची जबाबदारी, मुलांच्या शिक्षणाचा खर्ज, कर्जाचे हप्ते असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर उभे होते. मोठा मुलगा बारावीत, दर दुसरा मुलगा आठवीत शिकत होता.

या मुलांच्या भवितव्याचा विचार करून परिस्थितीशी लढण्याचा निर्धार सीमा यांनी केला. अगोदरपासूनच सुरू केलेल्या ब्युटी पार्लरमध्ये त्यांनी लक्ष घातले. १२-१२ तास काम केले. दिवसभर उभे राहून पाय सुजायचे, तरीही त्या मागे हटल्या नाहीत. मुलांनीही त्यांना मदत केली. साईश याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेताना शिकवणी घेतली, पेंटिंगची कामे केली.

ओंकारनेही त्याला मदत केली. सर्वांच्या प्रयत्नांतून आज काशीद कुटुंबाला चांगले दिवस आलेत. साईशने बी. ई. (मेकॅनिकल) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. छोटे-मोठे प्रोजेक्‍ट तयार करून तो आईला आर्थिक मदत करतोय. ओंकार हा बी. टेकचे (ॲग्रीकल्चर) शिक्षण घेतोय.

आपल्यावर आलेल्या परिस्थितीची सीमा यांना अजूनही जाणीव आहे. त्यामुळेच त्या अडचणी असलेल्या मुलींना, महिलांना सतत मदत करतात. ब्युटी पार्लरमध्ये असलेल्या कोर्सेसच्या फीमध्ये सवलत देतात. परिस्थितीशी झगडून मानाने जगावे, असा सल्ला त्या महिलांना देतात.

कधी कोणावर कोणती वेळ येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे महिलांनी सक्षम बनावे. कोण काय म्हणतेय, याकडे लक्ष न देता स्वतःच्या पायावर उभे राहावे.
- सीमा काशीद, कोडोली, सातारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com