#Navdurga स्नेहाच्या जिद्दीला प्रोत्साहनाचे बळ!

Sneha-Jadhav
Sneha-Jadhav

कऱ्हाड - मुलीला तिच्या आवडत्या खेळामध्ये बंधन न आणता त्यासाठी प्रोत्साहन देताना तिच्या जिद्दीला बळ मिळाले की राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचे यश मिळते, हे हजारमाची येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिने दाखवून दिले आहे. आता स्नेहाने ऑलिंम्पिकमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. 

हजारमाची येथील स्नेहा ही वेणूताई चव्हाण महाविद्यालयामध्ये सध्या कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. विठामाता विद्यालयात पाचवीत शिकत असताना स्नेहाने प्रथम व्हॉलिबॉल खेळात सहभाग घेतला. मात्र, वडील सूर्यकांत जाधव यांना स्नेहाने वैयक्तिक क्रीडा प्रकारात सहभाग घ्यावा असे वाटत होते. अखेर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत स्नेहाने गोळाफेक स्पर्धेत भाग घेतला. कोणतेही प्रशिक्षण नसताना केवळ ताकदीच्या जोरावर तिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. त्याचवेळी क्रीडा प्रशिक्षक दिलीपकुमार चिंचकर यांनी स्नेहाच्या अंगी असणाऱ्या क्रीडागुणांना हेरले. त्यांनी स्नेहाला हॅमर थ्रो खेळात मार्गदर्शन सुरू केले. तेव्हापासून ती तालुकास्तरीय स्पर्धेपासून या क्रीडा प्रकारात चमकू लागली. स्नेहा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू लागली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या स्नेहाचे वडील शेतकरी, तर आई गृहिणी आहे. दोन्ही भाऊ तिच्यापेक्षा लहान असून, एक दहावी तर दुसरा बारावीत आहे. मुलगी म्हणून स्नेहाला घरात कधीही दुजाभावाची वागणूक न देता तिच्या आवडीनिवडीला तितकेच प्राधान्य दिले जाते. केरळ, तमिळनाडू, रांची (झारखंड), हैदराबाद, पुणे येथे राष्ट्रीय स्तरावरील सहा स्पर्धा खेळताना स्नेहाने आजवर प्रत्येकी दोन सुवर्ण, कास्य व रौप्य पदक पटकावली. तुर्की व बॅंकॉक-थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिने सहभाग घेतला असून, तुर्की येथील स्पर्धेत सहावा व थायलंड स्पर्धेत आठवा क्रमांक पटकावला आहे. वडील शेतकरी असूनही स्नेहाच्या खेळाला प्रोत्साहन देण्यात ते पुढे असतात. आई-वडिलांच्या प्रोत्साहनासह प्रशिक्षक श्री. चिंचकर यांचा तसेच सुरवातीपासून तिच्या खेळाला सर्वतोपरी सहकार्य करणारे शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश पाटील यांचा तिच्या यशात सिंहाचा वाटा आहे, असे ती सांगते. स्नेहा केवळ खेळातच सरस नसून, अभ्यासातही हुशार आहे. दहावीला तिने ९१ टक्के तर बारावीला ९० टक्के गुण मिळवले आहेत. मात्र, खेळावर तिची नितांत श्रध्दा आहे. जोपर्यंत शरीर साथ देईल, तोपर्यंत खेळत राहणार असा तिचा निर्धार आहे. मात्र, तो व्यक्त करताना ऑलिंम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकून देशाच्या नावलौकिकात भर घालण्याचे तिचे ध्येय आहे. त्यासाठी तिची तयारी सुरू आहे. स्नेहाला राज्य शासनाची नुकतीच एक लाख ९८ हजारांची शिष्यवृत्तीही मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com