‘दुर्गामाता’ने बनविले स्वावलंबी : १५ वर्षांपासून समाजोपयोगी कार्यात अग्रसर

मिलिंद देसाई
Wednesday, 21 October 2020

सोनार गल्लीतील मंडळ; १५ वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रम

बेळगाव : महिलावर्गाला संघटित करण्यासाठी तसेच त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी सोनार गल्ली येथील दुर्गामाता महिला मंडळाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. गल्लीत आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्येही महिला मंडळाचा नेहमीच सहभाग राहिला. त्यामुळेच गल्लीतील युवक मंडळाप्रमाणेच महिला मंडळाच्या कार्याबाबतही नेहमी कौतुक होत असते.

सोनार गल्ली येथील महिलांनी एकत्र येत पंधरा वर्षांपूर्वी महिला मंडळाची स्थापना केली होती. सुरुवातीची काही वर्षे स्वसाहाय्य संघ चालवून गल्लीतील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. त्यामुळे अनेकांना शैक्षणिक व इतर प्रकारच्या कामांसाठी मदत झाली. गल्लीमध्ये भिशीची सुरवात करुन महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मंडळाने नेहमीच विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यास पुढाकार घेत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.

हेही वाचा- समुपदेशनाद्वारे वाढविला आत्मविश्वास : लॉकडाउन काळात महिलांना मदतीचा हात -

महिला मंडळातर्फे दरवर्षी रांगोळी स्पर्धा, हदगा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासह आरोग्य शिबिरे व इतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेतले जातात. गणेशोत्सवात अथर्वशीर्ष पठण कार्यक्रम करण्यामध्येही महिला मंडळ आघाडीवर असते. शिवजयंती उत्सवाच्या सर्व कार्यक्रमांमध्येही हिरारीने भाग घेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळ लक्ष देत असते.
गल्लीतील युवक मंडळालाही महिला मंडळाची मोलाची साथ लाभत आहे. अनेक कार्यक्रम युवक व महिला मंडळ एकत्रित येऊन साजरा करतात. आगामी काळात मंडळाच्या सभासदांची संख्या वाढविण्याबरोबरच त्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन करण्याचा निर्णय मंडळातर्फे घेण्यात आला आहे. 

सध्या मंडळाच्या अध्यक्षपदी स्मिता मुतगेकर असून उपाध्यक्षपदी गीता सुतार असून लिला मुतगेकर, सविता जाधव, सौम्या कुलकर्णी, अनिता सुतार, रोहिणी गिंडे, वंदना धामणेकर, सुवर्णा धामणेकर, सुषमा बांदिवडेकर, सुमन सप्रे आदी 
सभासद आहेत.
 

शहरातील अनेक महिला मंडळे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी पुढाकार घेत आहेत. यापासून प्रेरणा घेत सोनार गल्लीतील महिला मंडळाची वाटचाल सुरू आहे. महिलांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासह गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सवातही महिला मंडळ कार्यरत आहे. आगामी काळात मंडळाच्या माध्यमातून महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 
-स्मिता मुतगेकर, अध्यक्षा, दुर्गामाता महिला मंडळ, सोनार गल्ली

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navdurga special story by milind desai belgaum