"धाव'पदीने झाले ते विवाहबद्ध!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाकडे (धावणे) आपल्या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी आरोग्यदायी समृद्ध जीवन जगावे, यासाठी नित्यनेमाने व्यायाम करावा हा संदेश देण्यासाठी आम्ही धावत येऊन लग्नाचा निर्धार केला होता. तो पूर्ण केल्याचा आनंद होत असून, यामध्ये मॅरेथॉन परिवाराचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले.
- नवनाथ व पूनम

सातारा - आज सकाळी सूर्याची किरणे धरतीवर पोचू लागताच "तो' आणि "ती' मेढ्यातील (ता. जावळी) वेण्णा चौकातून आपल्या घरापासून साताऱ्याकडे धावत सुटले. दोघांच्याही मस्तकावर मोत्याच्या आणि फुलांच्या मुंडावळ्या रुळत होत्या. प्रसन्न गारवा आणि कोवळ्या किरणांच्या साथीत ते दोघे सप्तपदीच्या फेऱ्याऐवजी "धाव'पदी घालतच साताऱ्यातील विवाह नोंदणी कार्यालयात पोचले आणि आरोग्यदायी समृद्ध जीवनासाठी धावण्याचा संदेश देत शेकडो लोकांच्या साथीने विवाहबद्ध झाले.

काळोशी (ता. जावळी) येथील जगन्नाथ डिगे यांचे पुत्र नवनाथ यास धावण्याचा छंद आहे. मॅरेथॉनमध्ये तो नेहमी सहभागी होत असतो. आरोग्यदायी जीवनासाठी धावण्याच्या आपल्या या छंदातून इतरांनीही अंगीकारावा, असा संदेश आपल्या कृतीतून समाजाला मिळावा, यासाठी त्याने धावत जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. लिगाडेवाडी (ता. जावळी) येथील रघुनाथ चिकणे यांची कन्या पूनम हिनेही त्याच्या या निर्णयास संमती दर्शवली होती. अर्थातच दोघांचे कुटुंबीय आणि मित्र मंडळींनीही त्यांच्या या निर्णयास आज प्रत्यक्ष धावून पाठिंबा दर्शविला. सकाळी सव्वासहा वाजता मेढ्यातील वेण्णा चौकातून वधू-वर आणि वऱ्हाडी धावू लागले. साताऱ्यातील मोळाचा ओढा येथे नऊच्या सुमारास पोचले. मार्गावर ठिकठिकाणी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तेथून पुढे धावत ते सारे जण पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तहसील कार्यालयात दाखल झाले. त्या वेळी विवाह नोंदणी कार्यालयाच्या बाहेर रांगोळ्या, पायघड्या घालण्यात आल्या होत्या. विवाह अधिकारी नंदकिशोर गिरी यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती. वधू-वरांनी शपथ घेऊन सह्या करताच सर्वांनी या धावत्या लग्नाला टाळ्यांच्या गजरांनी शुभेच्छा दिल्या. या वेळी मॅरेथॉन असोसिएशन ऑफ साताराचे अध्यक्ष ऍड. कमलेश पिसाळ, माजी अध्यक्ष चार्टर्ड अकाउंटंट व्ही. एस. जाधव यांच्यासह पदाधिकारी व धावपटूंनी नवदांपत्यास पदक देऊन त्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. डिगे- चिकणे परिवारास शुभेच्छा देण्यासाठी नातेवाइकांबरोबरच नागरिकांची वर्दळ होती.

आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाकडे (धावणे) आपल्या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. नागरिकांनी आरोग्यदायी समृद्ध जीवन जगावे, यासाठी नित्यनेमाने व्यायाम करावा हा संदेश देण्यासाठी आम्ही धावत येऊन लग्नाचा निर्धार केला होता. तो पूर्ण केल्याचा आनंद होत असून, यामध्ये मॅरेथॉन परिवाराचे पाठबळ महत्त्वपूर्ण ठरले.
- नवनाथ व पूनम

Web Title: navnath & poonam marriage