Navratri Festival 2019 उदे गं अंबे...उदे...उदे... नवरात्रोत्सवास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

विविध मंडळांच्या वतीने यावर्षीही धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

सातारा : ढोल-ताशांचा गजर, भगव्या टोप्या घालून भगवे झेंडे फडकावत आई जगदंबेचा घोष करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या ओसंडून वाहणाऱ्या उत्साहात फुलांच्या उधळणीत मिरवणुका काढून आदिमाया आदिशक्ती देवी भगवती आई जगदंबेच्या उत्सव मूर्तींची प्रतिष्ठापना करून, तसेच घरोघरी घटस्थापनेने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ झाला. आता नऊ दिवस भक्ती आणि शक्तीच्या पूजेबरोबरच संगातीच्या तालावर रासगरबा आणि दांडियाच्या खेळात तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहात राहणार आहे. 

जिल्ह्यात नवरात्रोत्सव सार्वजनिकरित्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. जिल्ह्यात अगदी दुर्गम भागातही नवरात्रात देवींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जाते. ग्रामीण भागात अनेक मंडळांनी फुलांच्या सजावटीत आज मूर्तींची प्रतिष्ठापना केली. या वर्षीही मंडळांनी लखलखणाऱ्या हजारो विद्युत दिव्यांची रोषणाई केली आहे. तसेच सकाळी, सायंकाळी महाआरतीचे नियोजन केले आहे. विविध मंडळांच्या वतीने यावर्षीही धार्मिक कार्यक्रमांचे, तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. 

दरम्यान, विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आज तुळजापूर, अजिंक्‍यताऱ्यावरील मंगळाई, औंधची यमाई, कोल्हापूरची अंबाबाई अशा विविध शक्तिस्थानावरून शक्तीज्योती प्रज्वलित करून आणल्या. मूर्तींची विविध वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढून प्रतिष्ठापना करत कार्यकर्ते देवी जगदंबेचा जयजयकार करत होते. सायंकाळी उशिरापर्यंत मूर्तींची प्रतिष्ठापना विधिवत केली जात होती. 

नवरात्रात बहुतेक महिला नऊ दिवस उपवास करतात. उपवास काळात अनेक महिला फक्त फलाहार घेतात. या पार्श्‍वभूमीवर विविध प्रकारची फळे आणि रताळ्यांची आवक साताऱ्यात मोठ्या प्रमाणावर झाली आहे. रताळी 50 रुपये किलोने विकली जात आहेत. तसेच साधी खजूर शंभर ते दीडशे रुपये तर दर्जेदार खजूर 300 रुपये किलोने विकली जात आहे. 

अनवाणी व्रत, दांडिया अन्‌ तरुणाई 

नवरात्राची उत्सुकता तरुण वर्गात मोठी असते. ते भक्ती करतानाच उत्सवात आपल्या उत्साहालाही वाट करून देतात. अनेक युवक-युवती नवरात्रात पायात चप्पल न घालण्याचे व्रत जपतात. अगदी कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थीही हे व्रत निष्ठेने पूर्ण करतात, तसेच नवरात्रात संगीताच्या तालावर रास गरब्यात तरुणाई थिरकत राहते. शहरात आणि ग्रामीण भागातही रास दांडिया, गरबाचे कार्यक्रम आयोजिले जातात. आता ग्रामीण भागातील प्रत्येक मंडळापुढे या रास गरब्याने रात्री रंगून जातात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri festival begins in satara