औंधमध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

Yamaidevi-Murti
Yamaidevi-Murti

औंध - महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी, श्री कराडदेवी, श्री मूळपीठ देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त बुधवारपासून (ता. १०) ते शुक्रवारपर्यंत (ता. १९) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती श्री यमाई देवस्थानच्या मुख्य विश्‍वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी दिली.

बुधवारी (ता. १०) दुपारी १२ वाजता राजवाड्यात श्री कराडदेवी मंदिरात पुण्याहवाचन होईल. त्यानंतर गायत्रीदेवींच्या हस्ते कराडदेवीची स्थापना केली जाईल. महाआरती, मंत्रपुष्पांजली आदी कार्यक्रमही होतील. रात्री आठ वाजता महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली होईल. गुरुवार (ता. ११) ते सोमवार (ता. १५) या कालावधीत सकाळी व रात्री महानैवेद्य, महाआरती, मंत्रपुष्पांजली होईल. रात्री नऊ वाजता ह. भ. प. गजाननबुवा कुरोलीकर यांचे कीर्तन होईल. मंगळवारी (ता. १६) दुपारी १२ वाजता देवीच्या पाट्या पूजन, ओटी पूजनाचा कार्यक्रम होईल. श्री मूळपीठ डोंगर व ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात देवीच्या ओटी भरणाचा कार्यक्रम होईल.

बुधवारी अष्टमी उत्सवानिमित मूळपीठ डोंगरावर देवीची यात्रा भरविली जाईल. त्यावेळी दुपारी देवीचे पूजन करून पालखीतून देवीची डोंगरावर मिरवणूक काढली जाणार आहे. विविध देवतांना भेटी देऊन ग्रामस्थ, महिला, भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. गुरुवारी देवीची घट उत्थापना कार्यक्रमाबरोबर कुमार-कुमारी पूजनाचा कार्यक्रम होईल. नवरात्रात दोन वेळेस नियमित वाद्यवृदांची सलामी दिली जाणार आहे. तसेच राजवाड्यात शस्त्रपूजा केली जाईल. दसरा उत्सवानिमित्त औंध येथील ग्रामस्थांना राजवाड्यात महाप्रसाद दिला जाईल.

औंधमधील श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करून वाद्यवृंदाची सलामी देऊन देवीची पालखी सीमोल्लंघनासाठी निघेल. काजळ वडानजीच्या सीमेवर देवीची पालखी नेऊन गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी व राजघराण्यातील मान्यवर, मानकऱ्यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा कार्यक्रम होईल. पालखी मिरवणूक परत मंदिर, राजवाड्यात आल्यानंतर संस्थानच्या परंपरेनुसार होणाऱ्या दरबारात गवई गान, गुलाब पाणी, पान सुपारी देण्याचा तसेच दसऱ्यानिमित्त शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होईल. शुक्रवारी (ता. १९) गायत्रीदेवींच्या उपस्थितीत मानकऱ्यांना बिदाग्या देऊन लळित कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे. या उत्सवासाठी गणेशशास्त्री इंगळे व वसंतराव देशपांडे हे  नियमित पौरोहित्य पठण करतील.

रंगरंगोटी, विद्युत रोषणाईची कामे सुरू
सध्या औंध येथील राजवाड्यातील कराडदेवी, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिर, मूळपीठ डोंगरावरील श्री मूळपीठदेवी मंदिरामध्ये व परिसरात सध्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या ठिकाणी स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, धार्मिक विधीचीही जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती श्री यमाई देवस्थान कार्यालयातून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com