कोल्हापुरात बचावासाठी नेव्ही, कोस्टल गार्डची हेलिकॉप्टर येणार 

निवास चौगले
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे आकांडतांडव सुरू आहे. सर्वच नद्यांना महापूर येऊन पाणी अनेक मार्गावर तर आले आहेच पण जिल्ह्याच्या बहुंताशी नागरी भागात आणि गावांतही पाणी घुसले आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक, जनावरे अडकली आहेत.

कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरूच असून आपत्ती व्यवस्थापनावर येत असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन कोल्हापुरसाठी नेव्ही व कोस्टल गार्डची हेलिकॉप्टर मदतीसाठी बोलवण्यात आली आहेत. या दोन्हीही यंत्रणेच्या हेलिकॉप्टरना आताच परवानगी मिळाली आहे. याशिवाय 80 जणांचे लष्कराचे पथकही दुपारपर्यंत कोल्हापुरात दाखल होत आहे. 

गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचे आकांडतांडव सुरू आहे. सर्वच नद्यांना महापूर येऊन पाणी अनेक मार्गावर तर आले आहेच पण जिल्ह्याच्या बहुंताशी नागरी भागात आणि गावांतही पाणी घुसले आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक, जनावरे अडकली आहेत. जिल्हा प्रशासन गेल्या तीन दिवसांपासून आपत्तीतून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, तथापि त्यांच्यावर मर्यादा आल्याने शेवटी लष्कराला बोलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लष्कराबरोबरच नेव्ही व कोस्टल गार्डची हेलिकॉप्टरही मागवण्यात आली आहेत. केंद्र सरकारने तातडीने या सेवा पुरवण्यास परवानगी दिली आहे. 

जिल्ह्यात शिरोळ व करवीर तालुक्‍यात पूरस्थिती अतिगंभीर आहे. शिरोळ तालुक्‍यातील नृसिंहवाडी व परिसरातील आणखी काही गावांतील लोकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्याची गरज आहे. अशी परिस्थिती करवीर तालुक्‍यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे या गावांत निर्माण झाली आहे. हेलिकॉप्टरशिवाय हे काम अशक्‍य असल्याने नेव्ही व कोस्टल गार्डची हेलिकॉप्टर मिळावीत यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. प्रशासनाच्या या प्रयत्नांना यश मिळाले असून दुपारपर्यंत लष्करासह ही हेलिकॉप्टरही जिल्ह्यात दाखल होत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: navy and coastal guard will helps in kolhapur in flood condition