आंदोलनांमुळे पोलिसांची त्रेधा!

सातारा - मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरताच सैनिक स्कूलच्या मुख्य मैदानासमोर रविवारी आंदोलन करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी.
सातारा - मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरताच सैनिक स्कूलच्या मुख्य मैदानासमोर रविवारी आंदोलन करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी.

सातारा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जोरदार आंदोलने करण्यात आली. युवक आघाडीने मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या प्रवेशद्वारावरच कांदाफेक आंदोलन केले तर, महिला आघाडीने जिल्हा परिषद चौकात गाजरवाटप आंदोलन करत शासनाचा निषेध केला. या आंदोलनांमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे लॅण्डींगही ऐनवेळी बदलण्यात आले, तरीही राष्ट्रवादीने आंदोलनांचा योग साधलाच.

जिल्ह्यातील विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज साताऱ्यात आले होते. पूर्वनियोजित असा हा कार्यक्रम होता. त्यामुळे या दिवशी आंदोलने करण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले होते. त्याचबरोबर शेतकरी संघटना तसेच धनगर समाजही आंदोलनाच्या तयारीत असल्याची चर्चा होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पोलिसांची माहिती काढण्याची धावपळ सुरू होती.

हेलिकॉप्टर उतरण्याचा परिसर आणि सभेच्या ठिकाणी वारंवार तपासणी केली जात होती. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंदाज काढण्याचे काम गोपनीय विभाग करत होता. आंदोलनांच्या शक्‍यतेमुळे आज सकाळपासून शहरात ठिकठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यासह विविध गोपनीय पथके शहरात गस्त घालत होती. गर्दीच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली जात होती. 

पोलिसांची ही धावपळ व करडी नजर असूनही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आंदोलन करण्यात यशस्वी झाली. ऐनवेळी पोलिस कवायत मैदानाऐवजी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या मैदानावर उतरल्याने आंदोलनाचे नियोजनही बदलावे लागले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तेजर शिंदे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब महामुलकर कार्यकर्त्यांसह सैनिक स्कूल मैदानाच्या प्रवेशद्वारासमोर पोचण्यात यशस्वी झाले. त्यांनी रस्त्यावर कांदा ओतून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, काही वेळातच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पोलिस गाडीतून शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलन होणार नाही, अशी शक्‍यता होती. तोपर्यंत कार्यक्रमही सुरू झाला होता. त्यामुळे पोलिसही काही प्रमाणात निर्धास्त होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी व फादर बॉडीतील पदाधिकाऱ्यांनी फसव्या घोषणा करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चौकात गाजरवाटप आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर स्वतः अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील हे अधिकाऱ्यांसह सभेच्या स्थळापासून आंदोलनस्थळी गेले. तेथे महिला आघाडीच्या अध्यक्षा समिंद्रा जाधव व अन्य आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्याबरोबरीने राष्ट्रवादीच्या आंदोलनामुळे आजचा दिवस गाजला.

पोषण आहार योजनेतील महिला स्थानबद्ध
दरम्यान, शालेय पोषण आहार योजनेमध्ये काम करणाऱ्या महिलाही जिल्हा परिषदेसमोर थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मुख्यमंत्री येण्यापूर्वीच या महिलांना व त्यांच्याकडे असलेले बॅनर काढून घेतले. त्यांना पोलिस उपअधीक्षक कार्यालयात स्थानबद्ध करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com