प्रसंगी राष्ट्रवादीशी युती - पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला जिल्ह्यात काही ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत; पण या निवडणुकीत जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी मित्र पक्षांशी युती करण्याचे संकेत प्रदेश पातळीवरून मिळाले आहेत. त्यानुसार प्रसंगी राष्ट्रवादीशीही युती करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

सातारा - जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षाला जिल्ह्यात काही ठिकाणी उमेदवार मिळालेले नाहीत; पण या निवडणुकीत जातीयवादी पक्षांना सत्तेपासून रोखण्यासाठी मित्र पक्षांशी युती करण्याचे संकेत प्रदेश पातळीवरून मिळाले आहेत. त्यानुसार प्रसंगी राष्ट्रवादीशीही युती करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

भाजपची "कॅशलेस' मोहीम ही परदेशी कंपन्यांच्या कमिशनसाठीच आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""काही तालुक्‍यांत मुलाखतींसाठी इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला; पण काही तालुक्‍यांत उमेदवार मिळालेले नाहीत. युवक व महिलांचा प्रतिसाद चांगला होता. मुलाखत दिलेल्यांच्या यादीची छाननी होऊन येत्या चार ते पाच दिवसांत उमेदवारांची यादी अंतिम करू.''

किसन वीर कारखान्यावरील कार्यक्रमांमुळे मदन भोसले मुलाखतींसाठी उपस्थित नसल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, ""समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय राज्य पातळीवरून झाला आहे; पण सन्मानपूर्वक तोडगा निघाला तरच आघाडी होईल. मित्र पक्षांमध्ये शेतकरी संघटनेसह राष्ट्रवादीही असेल. सातारा तालुक्‍यात खासदार उदयनराजेंच्या विकास आघाडीसोबत चर्चा सुरू आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतला जाईल.''

मोदी सरकारने अडीच वर्षांत दिलेली आश्‍वासनांची फलनिष्पत्ती झाली का, हा मुद्दा आमच्या प्रचारात असेल. नोटाबंदीचा अनिष्ठ परिणाम झाला आहे. व्यापारी, शेतकरी वर्गात प्रचंड असंतोष आहे. नोटाबंदीतून भाजपने देशाचे आर्थिक नुकसान केले आहे. उलट निधी वाटून त्यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आणले आहेत. केवळ अमेरिकन कंपन्यांना कमिशन मिळावे म्हणून ही कॅशलेस मोहीम आहे, अशी टीकाही श्री. चव्हाण यांनी केली.

उंडाळकरांवर टीका
कऱ्हाड दक्षिणमध्ये विलासराव पाटील उंडाळकरांनी स्वतंत्र आघाडी काढली आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ""कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर 35 वर्षे निवडून येऊनही प्रत्येक निवडणुकीत त्यांनी नेहमीच सवता सुभा ठेवला. स्वत:च्या विचारांचे उमेदवार निवडून आणण्यावर त्यांचा भर राहिला. त्यासाठी त्यांनी इतर पक्षांशी जवळीक केली आहे. आता तर ते भाजपशी जवळीक करत आहेत. केवळ पक्षाचे म्हणणे न ऐकल्यामुळे त्यांचा पराभव झाला.''

Web Title: NCP Alliance - Prithviraj Chavan