राष्ट्रवादीतील इच्छुकांची बारामती, पुण्याकडे धाव 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जानेवारी 2017

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात तापू लागले असून, भाजपने तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांच्या जुळणीवर भर दिला आहे. कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती येत्या बुधवारी (ता. 25) कॉंग्रेस भवनात होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतील इच्छुकांनी तिकिटासाठी बारामती व पुण्याकडे धाव घेतली आहे. 

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यात तापू लागले असून, भाजपने तालुकानिहाय इच्छुकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांच्या जुळणीवर भर दिला आहे. कॉंग्रेस इच्छुकांच्या मुलाखती येत्या बुधवारी (ता. 25) कॉंग्रेस भवनात होणार आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतील इच्छुकांनी तिकिटासाठी बारामती व पुण्याकडे धाव घेतली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत यावेळी दोन्ही कॉंग्रेसच्या बरोबरीने भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच शिवसेना व इतर पक्षांच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादीने सर्वांत प्रथम इच्छुकांच्या मुलाखती घेऊन ही यादी बारामतीला अंतिम करण्यासाठी दिली आहे. येत्या दोन-चार दिवसांत ही यादी अंतिम होईल; पण तिकिटाच्या यादीतील आपले नाव येण्यासाठी इच्छुकांनी आता बारामती व पुण्याची वारी करण्यावर भर दिला आहे. अनेकांनी थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तर काहींनी थेट खासदार शरद पवारांची भेट घेऊन आपल्या तिकिटाची खात्री करण्यावर भर दिला आहे. 

या सर्व प्रक्रियेत यादी आताच जाहीर केल्यास तिकीट न मिळालेले इच्छुक इतर पक्षांच्या वाटेवर जातील, या भीतीने राष्ट्रवादी शेवटपर्यंत यादी जाहीर न करण्याच्या मन:स्थितीत आहे. कॉंग्रेसमध्ये गेला आठवडाभर शांतता होती. पण, येत्या बुधवारी येथील कॉंग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होईल. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे स्वत: उपस्थित राहून इच्छुकांशी चर्चा करणार आहेत. 

दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने गट व गणनिहाय तालुकावार इच्छुकांच्या मुलाखतींच्या माध्यमातून उमेदवारांची जुळणी सुरू केली आहे. आतापर्यंत 45 जागांवर इच्छुक उमेदवार मिळविण्यात भाजपला यश आले आहे. त्यांची चाचपणी करून मगच उमेदवारी निश्‍चित केली जाणार आहे. त्यासाठी या सर्व प्रक्रियेवर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील स्वत: लक्ष ठेऊन आहेत. 

तसेच नाराज पदाधिकारी व माजी आमदारांना भाजपमध्ये घेण्याची प्रक्रियाही दुसऱ्या बाजूने भाजपच्या नेत्यांनी सुरू ठेवली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्ष चार्ज झाले असून, जिल्ह्याबाहेरील विविध पक्षांच्या नेत्यांनीही जिल्ह्यात लक्ष घातल्याने संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Web Title: NCP aspirants of Baramati, Pune