राष्ट्रवादी काँग्रेसचा पडद्याआडचा ‘किंगमेकर’!

राष्ट्रवादी काँग्रेसचा पडद्याआडचा ‘किंगमेकर’!

सातारा - जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच पक्षांची धोबीपछाड केली. जिल्हा परिषदेसह दहा पंचायत समित्या ताब्यात घेतल्या. राज्यात भाजपची हवा असताना राष्ट्रवादीने बालेकिल्ला शाबूत ठेवला. त्यामागे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर यांची पडद्याआडची भूमिका त्यांना ‘किंगमेकर’ म्हणून सिद्ध करणारीच ठरली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर झाल्यावर खासदार उदनराजे भोसले यांनी मेळावा घेऊन ‘राजधानी सातारा जिल्हा विकास आघाडी’ची घोषणा करत नेहमीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडून राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, नगरपालिकेत मिळालेले संमिश्र यश व विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे जागे झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रथमच उदनराजेंच्या विरोधात खंबीर भूमिका घेतली. शेंद्रे येथे झालेल्या मेळाव्यात रामराजेंसह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदारांच्या विरोधात शड्डू ठोकला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही त्यांना बळ दिले. निवडणुकीतील जिल्ह्याची सूत्रे रामराजेंच हाताळतील, असेही सूतोवाच त्यांनी केले. त्यानंतर बारामतीत झालेल्या बैठकीतही शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांची झाडाझडती घेतली. याच बैठकीत उदयनराजेंच्या विरोधाला धार मिळाली.

पक्षश्रेष्ठींकडून बळ मिळाल्याने राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते चार्ज झाले. रामराजे व शिवेंद्रसिंहराजेंप्रमाणेच सर्वच आमदारांनी खासदार गटाला विरोध करण्याची खंबीर भूमिका घेतली. इथपर्यंत झालेल्या राजकारणातील हालचालींनंतर झालेल्या घडामोडीतून राष्ट्रवादी आणखी भक्कम होत गेली. त्याला कारणेही अनेक आहेत, तरीही त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे रामराजेंनी पडद्याआडून केलेल्या राजकीय हालचाली... 

बंडखोरांची यशस्वी समजूत
या निवडणुकीत राष्ट्रवादीतून इच्छुकांची संख्या खूप होती. त्यामुळे बंडखोरीचाही धोका होताच. या स्थितीत रामराजेंनी उमेदवार निवडीचे सर्वाधिकार आमदारांना देताना सबुरीचा सल्लाही दिला. बंडखोरी होऊ नये, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही बंडखोरी केलेल्या काही उमेदवारांशी त्यांनी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नातून राष्ट्रवादीतून बंडखोरी कमी झाली. रामराजेंनी पडद्याआडून केलेली पहिली राजकीय चाल यशस्वी ठरली.

प्रचार यंत्रणेवर लक्ष
निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर रामराजेंनी जाहीर सभा घेण्याचे टाळले. जिल्ह्यात प्रचार यंत्रणा राबवण्यावर बर दिला. दररोज प्रत्येक आमदारांशी संपर्क साधून त्यांनी आढावा घेतला.

अडचण असेल तेथे मार्ग काढले. प्रमुख कार्यकर्त्यांची नाराजी दूर करून त्यांना प्रोत्साहन दिले. या प्रयत्नांमुळे अनेक दिवसांनतर राष्ट्रवादीच्या प्रचारात एकजिनसीपणा जाणवला. त्याचे परिणाम निकालातून दिसून आले. अतिशय संयमीपणे प्रचाराची रणनीती आखण्यात रामराजे यशस्वी ठरले.

आक्रमकतेला प्रोत्साहन
निवडणूक म्हटले, की आरोप-प्रत्यारोप आलेच. त्यातही रामराजे, उदयनराजे किंवा आमदार जयकुमार गोरे व शेखर गोरे यांच्यातील आरोप-प्रत्यारोप ठरलेले असतात. या निवडणुकीतही तसे घडले. रामराजेंवरही आरोप झाले. मात्र, त्याचे उत्तर देण्याचे त्यांनी जाणीवपूर्वक टाळले. त्याऐवजी त्यांनी आमदार व अन्य पदाधिकाऱ्यांना आक्रमक होण्यासाठी प्रवृत्त केले. प्रचारातील आक्रमकता कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाला पाठबळ दिले. या आक्रमक प्रचारामुळे कार्यकर्तेही चांगलेच चार्ज झाले. आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे, शेखर गोरे, वसंतराव मानकुमरे, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी प्रचारातील आक्रमकतेची धार कमी होऊ दिली नाही. या सर्वांना रसद पुरवली ती रामराजेंनीच. हाच आक्रमक प्रचार कामी आला. आमदार जयकुमार गोरे व उदयनराजेंच्या आक्रमकतेला शह देण्यात रामराजेंची सेना यशस्वी ठरली. त्यातूनच माण, जावळी व साताऱ्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळू शकले.

राजकीय वजन वाढवणारे यश 
पक्षाध्यक्षांनी सूचना केल्याने रामराजेंचीही निवडणुकीतील जबाबदारी वाढली होती. रामराजेंनीही परिस्थितीनुसार राजकीय डावपेच टाकले. संयमीपणे प्रचार यंत्रणा राबवली. या सर्वांचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले. या एकतर्फी वर्चस्वामुळे रामराजेंचे राष्ट्रवादीतील राजकीय वजन आणखी वाढणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com