चंदगडला घड्याळ व कमळ एकत्र येण्याच्‍या हालचाली?

सुनील कोंडुसकर
रविवार, 15 जानेवारी 2017

चंदगड - आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपची युतीच्या दिशेने घोडदौड सुरू आहे. यावर अद्याप अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले नसले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होणारे समाधान हेच दर्शवत आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदिनी बाभूळकर व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य गोपाळराव पाटील यांनी एकमेकाला शब्द पाळण्याचे वचन दिल्याने लवकरच युतीची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या दहा वर्षांत वाढलेले पक्ष, गट पाहता विजयी पताका फडकावण्यासाठी युतीचा फॉर्म्युला अनिवार्य आहे. या वेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी युतीचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्त्यांना दिल्याने निर्णय घेणे सोपे झाले आहे.

त्याचाच लाभ उठवत राष्ट्रवादी व भाजपच्या येथील प्रमुख कार्यकर्त्यांत चर्चेच्या फेऱ्या यशस्वी झाल्याचे समजते. तालुक्‍यातील जिल्हा परिषदेचा एक गट कमी होऊन चार, तर पंचायत समितीचे दोन गण कमी होऊन ही संख्या आठवर आली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी दोन, तर पंचायत समितीच्या प्रत्येकी चार जागा वाटून घेतल्याचे समजते. डॉ. बाभूळकर व गोपाळराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जागावाटपाची चर्चा झाली आहे. दरम्यान, या आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.

स्वाभिमानीला पंचायत समितीच्या दोन जागा देण्यावर दोन्ही पक्ष अनुकूल आहेत; परंतु संघटना माणगाव जिल्हा परिषदेच्या जागेवर ठाम असल्याने प्रत्यक्ष चर्चा होऊ शकलेली नाही. गतवेळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र होता तरीही पंचायत समितीच्या दहापैकी चार, तर जिल्हा परिषदेच्या पाचपैकी एका जागेवर यश मिळवले होते. 

हालचालींना वेग 
या दोन पक्षांची युती झाल्यास ती प्रबळ ठरणार आहे. त्यांच्या अंतिम निर्णयावर तालुक्‍यातील अन्य पक्ष, गट एकत्र येणार आहेत. माजी राज्यमंत्री भरमू पाटील गट, माजी आमदार नरसिंगराव पाटील गट, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सुरेशराव चव्हाण पाटील गट, ओमसाई विकास आघाडी, अप्पी पाटील गट, आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष व इतर संघटना यांच्यातील हालचालींनाही वेग आला आहे.

Web Title: ncp & bjp compramise movement in chandgad