शेखर गोरेंचं दुखणं...राष्ट्रवादीला ताप!

Shekhar-Gore
Shekhar-Gore

सातारा - फलटणमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यातील गोंधळानंतर शेखर गोरे आणि त्यांच्या समर्थकांवर पक्ष कारवाई करणार का याकडे लक्ष लागले आहे. परंतु, निष्ठावंतांच्या या दुखण्यावर पक्षातील नेत्यांनी वेळीच इलाज करण्याचे टाळल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाध्यक्षांसमोर पदाधिकारी तोंड उघडू लागले आहेत. श्री. पवार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा पश्‍चिम महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकार घडला.

पक्ष कोणताही असो, अंतर्गत धुसफूस असतेच. याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अपवाद नाही. पण, आपली भूमिका कोठे मांडायची ? हे पदाधिकाऱ्याला समजले पाहिजे. अन्यथा पक्षाला तोंडघशी पडावे लागते. असाच प्रकार फलटणच्या कार्यक्रमात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शेखर गोरे यांनी गेल्या अनेक दिवसांची खदखद शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सुसंवाद मेळाव्यात उघडपणे मांडली. खरेतर अशा गोष्टी मांडण्याचे ते व्यासपीठ नव्हते. त्यामुळे त्यादिवशी गोरे व त्यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रकाराबद्दल पक्षातील सर्वांनीच नाराजी व्यक्त केली.

तसेच आता शेखर गोरे यांचे राजकीय अस्तित्व धोक्‍यात आल्याचे सर्वजण सांगू लागले आहेत. मुळात माढा मतदारसंघात पक्षांतर्गत धुसफुशीमुळेच शरद पवारांनी विद्यमान खासदारांसह इतर इच्छुकांना बाजूला ठेऊन स्वत: लढण्याचा निर्णय घेतला. पक्षाचे अध्यक्षच निवडणूक लढत असल्याने पक्षातील सर्वांनी नाराजी बाजूला फेकून त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. 

यानिमित्ताने प्रत्येक ठिकाणच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत जाणून घेणे व त्यांच्याशी सुसंवाद साधण्याच्या हेतूने पहिलाच मेळावा फलटणला घेतला. या मेळाव्यात शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना डावलल्याची भावना निर्माण झाल्यामुळे गोंधळ घातला. खुद्द शेखर गोरेंनीही व्यासपीठावर जाऊन श्री. पवारांशी चर्चा केली. कार्यकर्ता म्हटले की, मानसन्मान आलाच; पण प्रत्येक वेळी तो मिळेलच असे नाही.

शेखर गोरेंवर ‘मोकां’तर्गत कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळपासून पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना डावलल्याची भावना निर्माण झाली. यासंदर्भात त्यांनी प्रसिध्दी माध्यमातून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पण, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत आपली सल कधीच मांडली नाही. त्यामुळे ते बाजूला पडले गेले.

त्याच दरम्यान, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे माण तालुक्‍याच्या राजकारणात ‘लाँचिंग’ झाले. सुरवातीला सामाजिक कामातून आपला ठसा उमटवत श्री. देशमुख यांनी हल्लाबोल यात्रेत ते थेट राष्ट्रवादीच्या बॅनरवर दिसले. तेथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते घेऊन जावून शक्तिप्रदर्शन केले होते. हेच शक्तिप्रदर्शन शेखर गोरेंना झोंबले. (कै.) सदाशिवराव पोळ यांच्यानंतर माण तालुक्‍यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांत राष्ट्रवादीची ताकद निर्माण करण्याचे काम शेखर गोरेंनी केले. 

त्यामुळे त्यांना पक्षाकडून अपेक्षा होत्या. त्यातच विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडे सर्वाधिक मते असूनही झालेला पराभव हा त्यांच्या जिव्हारी लागला आहे. ही सर्व खदखद शरद पवार यांच्या 
फलटणच्या कार्यक्रमात बाहेर आली. आता शेखर गोरेंवर पक्षाकडून कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com