Loksabha 2019 : संजय शिंदे यांनी बड्या-बड्यांना बनवले 'मामा' 

अभय दिवाणजी
शनिवार, 23 मार्च 2019

तुम्हारा चुक्‍याच..! 
शिंदे यांना याच माढा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला होता. ही संधी सोडत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जर भाजपकडून उमेदवारी स्वीकारली असती तर राष्ट्रवादी सोडण्याची मानसिकता असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असती. एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम झाले असते. पालकमंत्री श्री. देशमुख यांची हीच तर खेळी होती. परंतु ती यशस्वी झाली नाही. भाजपमधील पालकमंत्री गटाकडून संजयमामा "तुम्हारा चुक्‍याच..!' अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. 

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये "पहले आप... पहले आप...'ची मोहीम अखेर आज संपुष्टात आली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना पक्षात घेऊन राष्ट्रवादीने त्यांची उमेदवारी जाहीर केली. या प्रकारामुळे पालकमंत्र्यांना दोन पावले मागे जावे लागले तर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीत बाजी मारली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होताना श्री. शिंदे यांना जवळ केलेल्या पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील बड्या-बड्या नेत्यांना "मामा'च बनवल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे पालकमंत्री देशमुख प्रचंड व्यथित झाले आहेत. 

शिंदे यांचा आज समर्थकांसह बारामती येथील गोविंद बागेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. याचवेळी श्री. शिंदे यांची माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली. राजकारणातील मोहिते-पाटील व शिंदे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रुत आहे. दोन्ही बाजूंनीही आता शड्डू ठोकण्यास कोणताही अडसर राहिला नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीआधीच श्री. शिंदे, विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, विजयराज डोंगरे या समविचारी मंडळीने प्रचंड व्यूहरचना आखून यशश्री खेचून आणली. राष्ट्रवादीचे संख्याबळ असतानाही अपक्ष म्हणून निवडून आलेले श्री. शिंदे यांनी भाजप, शिवसेना, कॉंग्रेस अशा सर्व पक्षीयांबरोबरच विविध आघाड्यांचा पाठिंबा घेत बिनविरोध निवडून येण्याची किमया केली होती. श्री. शिंदे व श्री. परिचारक यांनी 2014 मध्ये महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढविली होती. त्यामुळे ही बांधावरील नेतेमंडळी नेमकी काय भूमिका घेतात याकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागले होते. माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना विरोध करण्यासाठी या नेत्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडणे पसंद केले आणि जिल्हाभर त्यादृष्टीने वाटचाल सुरू केली. 

दरम्यान, पालकमंत्री श्री. देशमुख यांनी आपली ताकद लावून श्री. परिचारक आणि श्री. शिंदे यांची सतत पाठराखण केली. त्यावेळीही आणि आताही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी या दोघांचे कधी जमलेच नाही. यातून पक्षांतर्गत राजकारण असो की जिल्हा परिषदेतील विकासकामे याबाबत पालकमंत्री गट नेहमीच सहकारमंत्री गटावर मात करीत असे. या सर्व प्रकारांबाबत सहकारमंत्री गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने "माहितीची खजिना' सादर केला जात असे. परंतु पालकमंत्र्यांची बूज राखण्यासाठी मुख्यमंत्री याकडे नेहमीच कानाडोळा करीत असत. श्री. शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे पालकमंत्र्यांच्या राजकीय खेळीला अचानकच ब्रेक बसला आहे. भाजपने माढा मतदारसंघाची जबाबदारी सहकारमंत्र्यांकडे तर सोलापूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे सोपविली आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनविण्यासाठी त्यावेळेस पाठिंबा दिलेल्या सर्वच नेत्यांना "मामा' बनवत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करीत माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास संजय शिंदे सज्ज झाले आहेत. 

तुम्हारा चुक्‍याच..! 
शिंदे यांना याच माढा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह धरला होता. ही संधी सोडत त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जर भाजपकडून उमेदवारी स्वीकारली असती तर राष्ट्रवादी सोडण्याची मानसिकता असलेल्या मोहिते-पाटील कुटुंबीयांसमोर मोठी अडचण निर्माण झाली असती. एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम झाले असते. पालकमंत्री श्री. देशमुख यांची हीच तर खेळी होती. परंतु ती यशस्वी झाली नाही. भाजपमधील पालकमंत्री गटाकडून संजयमामा "तुम्हारा चुक्‍याच..!' अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे. 

"सकाळ'चा बोलबाला 
"सकाळ'च्या पश्‍चिम महाराष्ट्र वार्तापत्रात "उडाले ते कावळे... राहिले ते मावळे...' या मथळ्याखाली बांधावरच्या नेत्यांबाबत सविस्तर विवेचन केले होते. बारामती येथे आज झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी श्री. मोहिते-पाटील यांचा नामोल्लेख टाळत "उडाले ते कावळे...' असे विधान केले. त्यांच्या या वाक्‍यावर उपस्थितांनी दाद दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Sanjay Shinde contest loksabha election in Madha constituency