डिजिटल लावून कुणी आमदार, खासदार होत नाही

धर्मवीर पाटील
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

देशात सध्या जात-पात-धर्म याचे राजकारण सुरू आहे. माणसाला किंमत राहिलेली नाही. आपणाला एकत्र राहून देशावर आलेल्या या संकटातून मुक्त करावे लागेल. त्यासाठी जयंत पाटील यांच्यासारख्यांना ताकद द्यावी लागेल, तीच खऱ्या अर्थाने राजारामबापूंसारख्या नेत्याला जन्मशताब्दीची श्रद्धांजली ठरेल."

- शरद पवार

इस्लामपूर - डिजिटल लावून कुणी आमदार, खासदार होत नाही. त्यासाठी लोकांची कामं करावी लागतात, असा टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे लगावला. जयंत पाटील यांनी केलेल्या कामांच्या जीवावरच ते लोकांचे नेते बनले आहेत, त्यांची लोकांशी बांधिलकी आहे, येत्या काळात त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, याहीवेळी लोक त्यांच्याच पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने ते इस्लामपुरात आले होते. त्यांनी राजारामबापू पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना राज्यात आणि देशात बापूंनी कसे काम केले याविषयीचे किस्से सांगितले. त्यानंतर देश तसेच स्थानिक राजकारणावर देखील त्यांनी भाष्य केले.

श्री. पवार म्हणाले, "कार्यक्रमाला येताना शहरात बरेच डिजिटल पाहिले, ज्यावर भावी आमदार असा उल्लेख आहे. बऱ्याच ठिकाणी मी जातो तेव्हा मी असे डिजिटल पाहातो. पण आमदार किंवा खासदार व्हायला डिजिटल नव्हे लोकांच्या कामांची गरज असते. जो लोकांची कामे करतो त्याला वाळवा तालुका साथ देतो, हे या तालुक्याचे वैशिष्ट्य आहे. इथली माणसं भारी आहेत, जे योग्य आहेत, त्याला साथ देतात. जे अयोग्य आहे, त्याला दाद देत नाहीत."

पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांविषयी ते म्हणाले, "पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या तक्रारी आहेत की, कामे होत नाहीत. आता हा अनुभव जयंत पाटील यांना का नाही? सत्ता असो किंवा नसो काम कसं करून घ्यायचे ते त्यांच्याकडून शिकायला हवे. आपल्या कामाची फाईल सर्वांच्या बरोबर गेली कधी आणि मंजूरही झाली कधी ते कुणालाच कळत नाही. त्यांच्या संस्था राज्यात अव्वल आहेत. कारखाना, शिक्षण संस्था याना कधीच अडचण आली नाही. आपल्या कामाशी बांधिलकी असेल तर लोकांचा पाठिंबा मिळतो. जनतेने याहीपुढे अशीच साथ द्यावी. त्यांच्यावर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. उद्याचा महाराष्ट्र विधायक अर्थाने बदलण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, अशांपैकी जयंतराव एक आहेत." 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar comment