ईडीच्या चाैकशी संदर्भात शरद पवार म्हणाले,...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

राजकारणात विरोध करणाऱ्यांना नाउमेद केले जात आहे. बापजन्मांत गुन्हा न करूनही माझे नाव घेतले जाते. ईडीने काय चौकशी करायची ते करावी, असे लय बघितले, आता आम्हीही काय दाखवायचे ते दाखवू. सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे.

- शरद पवार

इस्लामपूर - शेतकऱ्यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आणि गुन्हेगारीला पाठीशी घालणाऱ्या सरकारला का मते द्यायची? असा सवाल माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी येथे केला. तसेच  "आमची काय चौकशी करायची ते करा, असले लय बघितले, आता जे दाखवायचे ते आम्ही दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी आज येथे दिला.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादीची राज्यातील प्रचाराच्या सुरवातीची ही पहिलीच सभा असल्याचा आनंद व्यक्त करून  पवार म्हणाले, "जयंतरावांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. आजची गर्दी पाहून लागायचा तो निकाल लागला आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचे कष्ट करणाऱ्या बळीराजाच्या दुखण्याकडे दुर्लक्ष, त्यामुळे सत्तेत बदल गरजेचा आहे.

देशात कुठेही जा शेतीमालाच्या संबंधी तक्रारी आहेत. या सरकारला ज्ञान नाही. कांद्याची निर्यातबंदी का रोखली? विचारलं तर रोजच्या खाण्याचे काय होईल? असे म्हणणाऱ्यांना खायला असा किती कांदा लागतो? शेतकऱ्यांना काहीच मिळू न देण्याची या सरकारची नीती आहे., अशी टीकाही श्री. पवार यांनी केली.

राजकारणात विरोध करणाऱ्यांना नाउमेद केले जात आहे. बापजन्मांत गुन्हा न करूनही माझे नाव घेतले जाते. ईडीने काय चौकशी करायची ते करावी, असे लय बघितले, आता आम्हीही काय दाखवायचे ते दाखवू. सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे.

- शरद पवार

शेतकऱ्यांना शेतीमालाची किंमत ठरवता येत नाही, त्यामुळे शेतकरी संकटात आहे, कर्जबाजारी आहे. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मोठ्या लोकांची कर्जाची थकलेली ८६ हजार कोटी रुपयांची रक्कम बँकेत सरकारने भरली. सामान्य शेतकऱ्याची कर्जाची मात्र किरकोळ रक्कम थकली तर थकबाकीदार होतो, त्याच्यावर कारवाई होते. त्यामुळेच आत्महत्या वाढल्या आहेत. त्याला जबाबदार असणाऱ्यांच्या हातात पुन्हा सत्ता द्यायची का? असा सवालही श्री. पवार यांनी यावेळी केला.

जयंत पाटलांनी वाळवा तालुक्यात औद्योगिक, कृषी क्षेत्राला चालना दिली. त्यांचे कर्तृत्व मान्य केलेच पाहिजे. अडचणीच्या काळातकेंद्र आणि राज्य सरकार भूमिका घ्यायला तयार नाही. बेकारी वाढली, कायदा आणि सुव्यवस्था बिघडलीय. कुठे ना कुठे अत्याचार सुरूच आहेत. गुन्हेगारांना संरक्षण दिले जात आहे. अनेक तरुण बेकार आहेत, त्यांना नोकरी नाही. अशांना मते का द्यायची? आता त्यांना मतदानाच्या दिवशी धडा शिकवण्याची वेळ आली आहे, असेही श्री. पवार म्हणाले. 

प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना प्रगतीविषयी विचारले तर ते कलम 370, पुलवामा हल्ला याविषयी सांगतात; पण सामान्यांच्या दुःखाचे काय? काश्मीरमध्ये सध्या स्मशानशांतता आहे. सरकारकडे सांगण्यासारखे काहीही नाही.

- शरद पवार

निवडणुकीत अर्ज भरताना स्वतःच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक असते; मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी खटल्याची माहिती नीट भरली नाही. त्यावर सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. ही दडपशाही आहे. राज्याचे चित्र बदलतंय. आमच्याकडेही लोक खूप संख्येने येतायत, मोठी गर्दी आहे. सरकारकडून लोकप्रतिनिधीवर दडपण आणले जात आहे. हे चित्र बदलायचे असेल तर सत्ता काढून घेतली पाहिजे.", असेही श्री. पवार म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP Chief Sharad Pawar comment in Islampur