Loksabha 2019 : मी मर्द मराठी माणूस, लुंग्यासुंग्यांच्या टीकेला घाबरत नाही : पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

परदेशातील काळ्या पैशाचे आमिष दाखवून, ज्याला स्वत:चे घरदार नाही अशा व्यक्तीने दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावली. नोटाबंदीतून भ्रष्टाचार व काळा पैसा बाहेर काढण्याचे जाहीर करणाऱ्या सरकारने चार दिवस सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे केले. त्यात 110 नागरिक मरण पावले आणि दोन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 
- शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष

शेवगाव : "सत्तर वर्षांत सरकारने काय केले, असा प्रश्न काँग्रेसला विचारणाऱ्यांनी, त्यांच्याही दहा वर्षांतील सरकारच्या काळात काहीच काम झाले नाही, हेच दाखवून दिले. गेल्या पाच वर्षांत गांधी घराण्याला शिव्या घालण्याशिवाय सरकारने काही केले नाही. आता आमच्या कुटुंबाची वेळ आली आहे; परंतु हा मर्द मराठी माणूस अशा लुंग्यासुंग्यांच्या टीकेला घाबरत नाही,'' अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेचा पुन्हा समाचार घेतला. "ज्याला स्वत:चे घर सांभाळता आले नाही, त्यांनी माझ्या घराची चिंता करू नये,' असा पुनरुच्चारही त्यांनी केला. 

नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी येथे आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. 

पवार म्हणाले, ""देशातील आजपर्यंतच्या सरकारांनी सैनिकांच्या शौर्याचे कधीही राजकारण केले नाही. सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गैरफायदा घेण्याचीसुद्धा काही हद्द असते. देशाच्या संरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही कधीही राजकारण केले नाही आणि करणारही नाही; मात्र सध्याच्या सरकारला याचा विसर पडला आहे. "आमच्या मुलाच्या बलिदानाचे राजकीय भांडवल करू नका,' अशी विनंती करण्याची वेळ हुतात्म्यांच्या कुटुंबीयांवरच येते, ही खूप दुर्दैवी बाब आहे.'' 

पवार म्हणाले, ""गोरगरिबांना गॅस दिल्याची जाहिरातबाजी करताना गॅस सिलिंडरच्या किमतीत तिप्पट वाढ झाल्याचे का सांगत नाहीत? "ना खाऊंगा ना खाने दूँगा,' असे म्हणत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने मागच्या सरकारच्या काळातील साडेतीनशे कोटींचे राफेल विमान 1660 कोटींना विकत घेतले. हा भ्रष्टाचार नाही का? दोन हजार कोटी रुपये खर्चून 55 महिन्यांत 92 वेळा परदेश दौरा करणाऱ्या पंतप्रधानांकडून देशाला काय मिळाले, याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. '' 

परदेशातील काळ्या पैशाचे आमिष दाखवून, ज्याला स्वत:चे घरदार नाही अशा व्यक्तीने दुसऱ्यांच्या घरात भांडणे लावली. नोटाबंदीतून भ्रष्टाचार व काळा पैसा बाहेर काढण्याचे जाहीर करणाऱ्या सरकारने चार दिवस सर्वसामान्य नागरिकांना रांगेत उभे केले. त्यात 110 नागरिक मरण पावले आणि दोन कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. 
- शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष

Web Title: NCP Chief Sharad Pawar targets PM Narendra Modi in election rally