पवारांच्या सातारा दौऱ्याने राष्ट्रवादीला मिळणार का बूस्टर डोस? 

राजेश सोळसकर 
रविवार, 22 सप्टेंबर 2019

भारतीय जनता पक्ष आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात उभ्या केलेल्या आव्हानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी ते कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

चाणाक्ष राजकीय नेता अशी देशभरात ख्याती असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साताऱ्याचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील; पण मुळात साताऱ्यासारख्या यशवंत विचाराच्या जिल्ह्यात पक्षावर अशी वेळ का आली असावी, याची कारणे शोधण्याची आवश्‍यकताही निर्माण झाली आहे. ती शोधली जावीत, अशी पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे. 

भारतीय जनता पक्ष आणि उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यात उभ्या केलेल्या आव्हानानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सातारा दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यासाठी ते कोणती व्यूहरचना आखणार, तसेच कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

खरे, तर सातारा जिल्ह्याने महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कॉंग्रेस विचारांचा पगडा असलेला जिल्हा म्हणून आपले स्थान अबाधित राखले आहे. एक-दोन अपवाद वगळता आजपर्यंत या जिल्ह्याने कॉंग्रेसची विचारसरणी कधी सोडलेली नाही. एखादा उमेदवार जेव्हा कधी पराभूत झाला असेल, तो त्या उमेदवाराबाबतची नाराजी किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराची व्यक्तिगत कामगिरीचा परिणामस्वरूप असावा. या कॉंग्रेसधारेची पकड इतकी मजबूत होती, की उमेदवार ऍडमिट असतानादेखील मोठ्या मताधिक्‍याने विजयी झाल्याचे उदाहरण प्रतापराव भोसले यांच्या रूपाने या जिल्ह्याने पाहिलेले आहे. पुढे 1999 मध्ये कॉंग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही याच विचारसरणीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला या जिल्ह्याने आपलेसे केले. 

ही सर्व राजकीय परिस्थिती असल्यामुळेच हा जिल्हा कॉंग्रेसचा आणि 1999 नंतर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला झाला. अलीकडच्या काळात मात्र या बालेकिल्ल्याला भगदाड पडते, की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मूळ कॉंग्रेसची तर वाताहत झाली आहेच; पण राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही धोक्‍याची घंटा वाजू लागली आहे. 

राष्ट्रवादीच्या तिकिटावर तीन वेळा खासदार झालेले उदयनराजे भोसले आणि त्यांचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भाजपवासी झाले आहेत. रामराजे नाईक निंबाळकर हेही वेगळी भाषा बोलू लागले आहेत. वाईतून मदन भोसले आणि माणमधून जयकुमार गोरे यांनाही पक्षात घेऊन भाजपने आघाडीला पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला जेरीस आणण्यात आपण यशस्वी झाल्याचे चित्र निर्माण केले आहे. 

सातारा जिल्ह्यात भाजपने राष्ट्रवादीची अशी कोंडी केली असताना जराही विचलित न झालेले पक्षाध्यक्ष शरद पवार या सर्व परिस्थितीला कसे सामोरे जाणार, ते कोणती खेळी खेळणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चाणाक्ष राजकीय नेता अशी देशभरात ख्याती असलेले श्री. पवार हा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न करतील; पण मुळात साताऱ्यासारख्या जिल्ह्यात पक्षावर अशी वेळ का आली असावी, याचे आत्मपरीक्षणही राष्ट्रवादी कॉंग्रेसने करण्याची गरज निर्माण झाली आहे. 
भारतीय जनता पक्षाने केंद्रातील आणि त्यापाठोपाठ राज्यातील सत्ता हस्तगत केल्यानंतर बेरजेचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवारी देताना सातत्याने "इलेक्‍टिव मेरिट'ला प्राधान्य दिले. तसे ते द्यायलाही हरकत नसावी; पण या प्रयत्नात पक्षात समांतर व्यवस्था उभी करायला पाहिजे, या मुद्‌द्‌याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे पक्षात एक प्रकारे सुभेदार तयार झाले आणि याच सुभेदारांनी जेव्हा इतर पक्षाचा मार्ग धरला, तेव्हा त्या त्या मतदारसंघातील आख्खा पक्षच सोडून गेल्यासारखे चित्र निर्माण झाले. एखाद्या नेत्याने पक्ष सोडला तर त्याला समांतर उमेदवार पक्षातून तत्काळ उभा करता यायला हवा, हा संघटनीय राजकारणातला महत्त्वाचा मुद्दा इथे दुर्लक्षिला गेला. त्यामुळेच सध्या राष्ट्रवादीपुढे सक्षम उमेदवार शोधण्याची वेळ आलेली आहे. 

अर्थातच, या जिल्ह्यातील नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला असला तरी इथल्या जनतेची मूळ विचारधारा बदललेली आहे, असा दावा आता तरी कुणी करू शकणार नाही. याचे उत्तर मिळण्यासाठी आगामी निवडणुकीचे निकाल लागण्याची वाट पाहवी लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी सध्या तरी हा आशेचा किरण मानावा लागेल. 
उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर तिसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामागे त्यांचे काही निश्‍चित आडाखे असतीलही; पण जिल्ह्याला पुन्हा पोटनिवडणुकीला सामोरे जायला भाग पाडणारा हा निर्णय सर्वसामान्य जनतेला तितकासा रूचलेला दिसत नाही. निदान सोशल मीडियावरील प्रतिक्रिया तरी हेच सांगत आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभा निवडणुकीसोबत होणार नाही, हेही आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उदयनराजे समर्थकांच्या राजकीय अडाख्यांवर पाणी फेरले गेल्याचे बोलले जाते. उदयनराजेंचा लाभ होणार, की तोटा याची चर्चा लगोलग सुरू झाली आहे. पोटनिवडणूक जरी नंतर होणार असली, तरी विधानसभा निवडणुकीवर तिचा पूर्णपणे प्रभाव राहणार आहे. याचाच दुसरा अर्थ असा, की दोन्ही निवडणुकांत विकासाचे मुद्दे नेहमीप्रमाणे गौण ठरणार आहेत. विचारांची लढाई असेच या निवडणुकांचे स्वरूप राहणार आहे. यामध्ये यशवंतराव चव्हाणांनी या जिल्ह्याला दिलेला विचार सक्षम ठरणार का, या विचारालाच आव्हान देत पक्षांतर केलेले नेते प्रबळ ठरणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. पवारांचा आजचा दौरा म्हणूनच पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. 

सध्या जगभरात संभाव्य मंदीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादीतही राजकीय मंदी असल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्यावर पक्षाध्यक्ष बूस्टर डोस देणार का, याकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar tour in satara before Maharashtra Vidhan Sabha