सत्तेविना जिल्ह्यातील राष्ट्रवादी सैरभैर

सत्तेविना जिल्ह्यातील राष्ट्रवादी सैरभैर

सत्ता राखण्याचे आव्हान - राज्यातील सत्तेने भाजपला बळ; तिरंगी लढतीत त्रिशंकू चित्र
राजकारण पुन्हा तापणार आहे. आरोपांच्या फैरी झडणार आहेत. जिल्ह्यात आता जिल्हा परिषदेचा हंगाम सुरू झालांय ! तसं पाहिलं तर नेत्यांचे सत्ता सामर्थ्य सांगण्यापुरतंच हे केंद्र राहिलं आहे. कमी झालेला निधी, विकासापेक्षा पगारावरचा खर्च अधिक, ग्रामीण विकासाच्या क्षमताच हरविलेल्या या केंद्रावरून  वातावरण तापणार असले तरी केवळ राजकीय धुळवड असेल. मुद्दे हरविलेल्या या धुळवडीत पक्षांतरे वाढणार आहेत. अर्थात पडझडीनंतरही काँग्रेसचं बरं चाललंय...सत्तेविना राष्ट्रवादी खचली आहे तर सत्ताभोगासाठी आयराम गयारामांची पाऊले चालती भाजपची वाट, असे दृश्‍य आहे. शब्दांत सांगायचे तर झेडपीचे चित्र त्रिशंकूच!

पाच वर्षांत कसलाही करिष्मा दाखवू न शकलेली  राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचे सर्वत्र चित्र आहे. सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या लढाईत बहुमत असूनही राष्ट्रवादीला काँग्रेसने धोबीपछाड दिला. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत कॅप्टन संघ सावरतील असे वाटले पण नेते जयंत पाटील यांना स्वत:च्या घरच्या खेळपट्टीवर देखील हार मानावी  लागली. इस्लामपूर नगरपालिकेवर विरोधकांचा झेंडा फडकविण्यात भाजप, राजू शेट्टी, सदाभाऊ, नानासाहेब महाडिक आणि भाजपच्या आघाडीने यश मिळविल्याने वाळवा तालुक्‍यातील चित्र बदलले. आता पाठोपाठ शिराळ्यात राष्ट्रवादीला धक्‍का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच मानसिंगरावांच्या घरात फूट पडल्याने राष्ट्रवादीला बॅकफूटवर, तर भाजपच्या गोटांत जल्लोष आहे. शिराळ्याच्या नाईक कंपनीकडून मोठा दणका राष्ट्रवादीला बसला आहे. अर्थात यामुळे भाजपला येथे बळ मिळाले आहे. या तालुक्‍यात दोन्ही काँग्रेस तालुका पातळीवर एक झाल्या तरी भाजप येथे दोन गटांचा दावेदार बनला आहे. हा जोर का धक्‍का असताना आटपाडीतून राजेंद्रअण्णा कोणता भूकंप घडवितात  याकडे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून न लढता स्वत:ची वेगळी चूल ते मांडणार असून भाजपच्याच वळचणीला ते गेल्याचे चित्र आहे.

त्यामुळे गेली पंधरा वर्षे जिल्हा परिषदेवर राज करणारी राष्ट्रवादी खचत चालली असून जयंतरावांची पेरणी चुकल्याची चर्चा  आहे. मुळात विधान परिषदा निवडणुकीलाच अर्धी राष्ट्रवादी भाजपमध्ये गेली होती. आता उर्वरित तालुकास्तरावील एकेक सुभेदार पक्षांतराच्या वाटेवर  दिसू लागला आहे. आटपाडीत झेडपीचे चार गट, तर पंचायत समितीचे आठ गण आहेत.

येथे राष्ट्रवादीचेच वर्चस्व असलेले राजेंद्रअण्णाकडूनच आगळीक होत असल्याने पक्षाला मोठा फटका असेल. अशीच अवस्था तासगावाची आहे. येथे मुळात आर. आर. आबांच्या निधनाने पक्षाला मोठी किंमत मोजावी लागली असून पक्ष सावरलेला नाही. येथे अनेकजण भाजपमध्ये गेले आणि आता जिल्ह्यातील पहिली नगरपालिका भाजपच्या ताब्यात गेली आहे. अर्थात काही सरदार गेले तरी आबांना मानणाऱ्या तीन गटांतील गावे आजही राष्ट्रवादीच्या  पाठीशी असल्याने राष्ट्रवादीचा येथील जनाधार पूर्ण तुटलेला नसल्याने एवढीच जमेची बाजू आहे.

वाळवा व मिरज तालुक्‍यात सर्वाधिक प्रत्येकी ११ अधिक ११ अशा २२ जागा आहेत. यापैकी वाळवा तालुक्‍यात नगरपालिकेसारख्या राष्ट्रवादीच्या बलाढ्य किल्ल्यालाच विरोधी आघाडीने सुरूंग लावला आहे. त्यामुळे जयंतरावांच्या स्वत:च्या तालुक्‍यातही राष्ट्रवादीसमोर विरोधकांचे आव्हान आहे. विरोधक एक नसतानाही येथे काँग्रेसने राष्ट्रवादीला जोराची टक्‍कर  दिली हा इतिहास आहे. आता शनिवारीच या शिराळा वाळव्यात भाजप-स्वाभिमानीसह मित्रांच्या आघाडीवर शिक्का मोर्तब झाला आहे. त्यामुळे येथे जयंतरावांची डोकेदुखी वाढणार आहे. मिरज पूर्व व कवठेमहांकाळात घोरपडे सरकारांचा करिष्मा राहणार आहे. ते स्वत:ची वेगळी आघाडी करणार; पण ते कोणासमोर राहणार हे गुलदस्त्यातच आहे. भाजपने त्यांना कोणाबरोबर  राहायचे ते स्पष्ट करा, असे सुनावले असल्याची चर्चा आहे. खासदार संजयकाका आणि घोरपडेंेचे फाटले असल्याने कवठेमहांकाळ-मिरज पूर्वमध्ये मोठा संघर्ष असणार आहे. सत्ता गेली तरी काँग्रेसचे येथील पॉकेटस्‌ आजही चांगली आहेत. अर्थात आबा नाहीत तसेच यावेळी या भागात आपले नेटवर्क असणारे मदन  पाटीलही नाहीत. याचा फटका राष्ट्रवादीला आहे तसा थोडाफार काँग्रेसला सोसावा लागेल. अर्थात एवढे असूनही मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रगतीपुस्तक फारसे चांगले नाही.

त्यामुळे मोदी लाटेत भाजपची चांदी झाली तरी काम नसल्याने येथे भाजपची अवस्था डेंजर झोनमध्येच आहे. मिरज पश्‍चिममध्ये काँग्रेसला वातावरण चांगले आहे. अर्थात काँग्रेसमधील कदम व दादा घराणे यांच्यातील गटबाजी हा शापच  आहे. काँग्रेसचा केवळ एक आमदार उरला असतानाही त्यांचा गटबाजीचा रोग गेलेला नाही. अर्थात असे असूनही कदमांनी विधान परिषद आणि नगरपालिका, नगरपंचायतीला आपले गड शाबूत राखले आहेत. जिल्हा परिषदेला या घडीला तरी काँग्रेस सक्षम दिसते आहे. भांडण्यापेक्षा एकत्र नांदण्याने चित्र बदलेल अशी पश्‍चात बुद्धी त्यांना झाली असली तरी जागा वाटपापर्यंत काही खरे नसते. पंतगरावांच्या बरोबरीने आता विश्‍वजीतही सक्रिय झाले आहेत. तर दुसऱ्याबाजूला दादागटाचे  नेतृत्व आता विशाल पाटील सांभाळत आहेत.

कडेगाव, पलूसमध्ये काँग्रेसला वातावरण चांगले आहे. मात्र कडेगावमध्ये पृथ्वीराज देशमुखांना जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून आपला काही तरी करिष्मा दाखवावा लागेल. सध्या भाजपमध्ये निम्मी राष्ट्रवादीच आहे. आणखी डबे जोडण्याचेही काम सुरू आहे. अरुण लाड यांची भूमिका ही तशीच आहे. एकाबाजूला भाजपचे राष्ट्रवादीकरण सुरू आहे. तर दुसऱ्याबाजूला भाजपचे  मित्र अस्वस्थ आहेत. शिवसेनेचा जिल्ह्यात एकमेव आमदार आहे. अर्थातच अनिल बाबर खानापूर आणि आटपाडीतील त्यांच्या प्रभाव क्षेत्रातून आपल्या जागा आणतील. मिरज तालुक्‍यातही शिवसेनेला थोडी स्पेस आहे. आता भाजपशी त्यांच्या पक्षाचे फाटले असले तरी त्यांची मैत्री भाजपमधील काहींशी आहे. त्यामुळे निवडणुकीत त्यांचे भाजपशी अंडरस्टॅंडिंग असेल असे संकेत परवाच देशमुखांनी दिले आहेत. 

जत तालुक्‍यात भाजपकडे आमदारकी असली तरी येथील चित्र कधी बदलेल याचा अंदाज लागत नाही. आमदार विलासराव जगताप आणि काँग्रेसचे विक्रम सावंत यांच्यातील हाडवैर टोकाचे आहे. तालुक्‍यात ९ गट असल्याने हा तालुका सत्तेचे गणित ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे. जगताप भाजपला येथे बहुमत देऊन मंत्रिपदाचे दावेदार होणार की सावंत काँग्रेसचे हिरो होणार? याबरोबरच येथे काँग्रेसचे सुरेश शिंदे व जनसुराज्यचे बसवराज पाटील एकत्र येऊन  तिसरी आघाडीही करत आहेत त्यामुळे काँग्रेसपुढे पेच आहे. एकूणच भाजपच्या नेत्यांना फरफॉर्मन्स दाखविला तरच मंत्रिपद मिळणार असल्याने चढाओढ मोठी आहे.
 

स्वाभिमानी : तुझे माझे पटेना पण तुझ्याशिवाय जमेना 
भाजपच्या एक्‍स्प्रेसला डबा जोडलेले राजू शेट्टी अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता शिवस्मारकाच्या भूमिपूजनापासून सुरू झाली आहे. सदाभाऊ मंत्री झाल्यानंतर शेट्टीं यांना पाहिजे तेवढी स्पेस माध्यमातही मिळत नसल्याचे चित्र आहे. नुकतेच पत्रकार संघाच्या येथील कार्यक्रमात सदाभाऊंनी मला अधिक जबाबदाऱ्या मिळताहेत त्यामुळे अनेक जणांना पोटदुखी आहे, असे म्हटले होते. आता सदाभऊंचा तीर कोणाकडे होता याची चर्चा झालीच! जयसिंगपुरात दोघांनी मिळून सांगितले  की, आम्ही भाजपबरोबर बांधील नाही. आता शेट्टींची नाराजी समजू शकते, पण सदाभाऊंना भाजपशी जुळवून घ्यावे लागत असल्याने त्यांची कसरत सुरू आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या मैदानात स्वाभिमानीचा गोंधळ आहे. शिराळा-वाळव्यात ते भाजप बरोबर आहेत, तर अन्यत्र स्वतंत्रपणे शिवसेना, काँग्रेससह कोणाबरोबरही जाणार असे ते सांगू लागले आहेत. अर्थात कोणतीही तत्त्वे सर्वच आघाड्यामागे दिसत नाहीत. यापूर्वी त्यांनी भाजपला जिल्ह्यात बरीच रसद दिली आहे. त्या मोबदल्यात भाजपने स्वाभिमानीला आमदारकी आणि मंत्रिपद देऊन सत्तेत वाटा दिला आहे; मात्र तुझे माझे पटेना आणि तुझ्याशिवाय चालेना, अशी या युतीची अवस्था आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com