राष्ट्रवादी, काँग्रेसला भाजप देणार टक्कर

राजेंद्र शिंदे
बुधवार, 18 जानेवारी 2017

खटाव - नव्याने झालेल्या खटाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या विसापूर व खटाव गणांमध्ये पक्षनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेसाठी नवा गट व गणांची रचना झाल्याने सर्वच पक्षांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. खटाव गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार, असे संकेत मिळत आहेत. गणांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सर्वच पक्ष नेत्यांपुढे डोकेदुखी वाढली आहे.

खटाव - नव्याने झालेल्या खटाव जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या विसापूर व खटाव गणांमध्ये पक्षनिहाय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

जिल्हा परिषदेसाठी नवा गट व गणांची रचना झाल्याने सर्वच पक्षांनी गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटींवर भर दिला आहे. खटाव गटात राष्ट्रवादी, भाजप व काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होणार, असे संकेत मिळत आहेत. गणांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सर्वच पक्ष नेत्यांपुढे डोकेदुखी वाढली आहे.

खटाव गट हा इतर मागास प्रवर्गातील पुरुषासाठी राखीव आहे. खटाव गटातून राष्ट्रवादीकडून प्रदीप विधाते हे प्रबळ दावेदार आहेत. पंचायत समितीत केलेले काम व सध्या जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाच्या माध्यमातून त्यांनी गटात चांगली बांधणी केली आहे. राजकीय पटलावर नव्याने उदयास आलेल्या राहुल पाटील यांनी काँगेसचे नेतृत्व मान्य करत पक्षबांधणीसाठी गावोगावी भेटीगाठींवर जोर दिल्याचे जाणवते. माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनेही राज्यातील व केंद्रातील सरकारच्या प्रसिद्धीच्या लाटेचा फायदा करून घेण्याचा चंग बांधला आहे. गटामध्ये राष्ट्रवादीची ताकद असल्याने साहजिकच गणांमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे. त्यामुळे गणांत उमेदवारी देताना पक्षाला बंडखोरी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण विरोधी गटातील नाराजांना आपल्या गटात घेऊन राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. 

भाजपला केंद्रीय पक्ष म्हणून स्वबळावर लढावे लागेल. जमेची बाजू म्हणजे महेश शिंदे यांनी तोडीस तोड उमेदवारी निवडताना मधुकर पाटोळेंवर विश्वास टाकला आहे. तथापि, खटाव व विसापूर गणासाठी उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यातच असल्याचे दिसून येत आहे. माजी आमदार डॉ. दिलीप येळगावरांना बरोबर घेऊन महेश शिंदेंचे खटाव गटातील मूळचे भाजपचे कार्यकर्ते, त्याचबरोबर नवीन कार्यकर्त्यांचे संघटन करण्याचे काम युद्धपातळीवर चालू असल्याचे दिसून येते. 

जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवलेल्या राहुल पाटलांनी देखील या वेळी राजकीय आखाड्यात उडी घेऊन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. माजी आमदार चंद्रहार पाटील यांचा वारसा सांगत त्यांनी खटाव तालुक्‍यातील दादांच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या गाटीभेटी घेऊन त्यांना पक्षात सामील करून घेण्याचा सपाटा लावला आहे. युवकांचा त्यांना चांगला पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्याचबरोबर स्वच्छ व भ्रष्टाचारमुक्त कारभार या मुद्यावर आगामी निवडणूक लढवण्याचा त्यांचा निश्‍चय आहे.

खटाव, विसापूर गणांत इच्छुकांची संख्या जास्त
खटाव गटात खटाव व विसापूर हे गण आहेत. खटाव गण हा अनुसूचित जाती प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित आहे. या गणातून विजय बोबडे, किरण गायकवाड, आनंदराव भोंडवे, प्रमोद कांबळे आदींनी उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विसापूर गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गातील पुरुषासाठी आरक्षित आहे. गणातून राष्ट्रवादीतर्फे नवनाथ वलेकर, सुहास ढोले, संतोष साळुंखे आदींसह अनेकांची नावे चर्चेत आहेत. भाजप व काँग्रेसने मात्र उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत.

Web Title: ncp, congress, bjp politics in zp